राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया खोळंबली; दिवसभर संकेतस्थळ ठप्प, उद्या नोंदणीची अंतिम मुदत  

By अविनाश कोळी | Published: August 22, 2024 07:09 PM2024-08-22T19:09:25+5:302024-08-22T19:09:55+5:30

विद्यार्थ्यांची चिंता वाढली

The medical admission process in the state was disrupted; Website down for the day, registration deadline tomorrow | राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया खोळंबली; दिवसभर संकेतस्थळ ठप्प, उद्या नोंदणीची अंतिम मुदत  

राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया खोळंबली; दिवसभर संकेतस्थळ ठप्प, उद्या नोंदणीची अंतिम मुदत  

सांगली : महाराष्ट्र सीईटी सेलचे संकेतस्थळ गुरुवारी दिवसभर ठप्प असल्याने वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया खोळंबली. शुक्रवार, २३ ऑगस्टला नोंदणीची मुदत संपणार असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. ‘नीट-युजी’ पात्र झालेले हजारो विद्यार्थी अद्याप नोंदणीपासून वंचित आहेत.

वैद्यकीय प्रवेशाकरिता राज्य शासनाच्या ८५ टक्के कोट्यातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ ते २३ ऑगस्ट या कालावधीत नोंदणीची मुदत दिली होती. बुधवारी संकेतस्थळ अत्यंत मंदगतीने सुरू होते. गुरुवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत हे संकेतस्थळ पूर्ण ठप्प झाले. त्यामुळे दिवसभरात विद्यार्थ्यांना नोंदणी करता आली नाही. शुक्रवारचा एकच दिवस नोंदणीकरिता शिल्लक असून, इतक्या कमी मुदतीत हजारो विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार नाही. नोंदणीच्या मुदतीमधील दोन दिवस संकेतस्थळामुळे वाया गेले आहेत. त्यामुळे मुदतवाढीची मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.

कॉपी, तसेच ग्रेस मार्कच्या प्रकरणामुळे यंदाची नीटची परीक्षा वादात सापडली होती. न्यायालयात यासंदर्भात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. या सर्व गोष्टींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. आता प्रवेश प्रक्रिया तरी सुरळीत पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना त्यातही विघ्न येत आहेत. केंद्रीय कोट्यातून प्रवेशाच्या वेळापत्रकात सुरुवातीला चुका झाल्या होत्या. आता राज्य शासनाच्या कोट्यातील प्रवेशावेळी संकेतस्थळामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. अन्य राज्यांतील प्रवेश प्रक्रिया व त्यांचे संकेतस्थळ व्यवस्थित काम करीत असताना महाराष्ट्रातच अधिक गोंधळ दिसत आहे.

..तर विद्यार्थ्यांचे नुकसान

नोंदणीस मुदतवाढ न मिळाल्यास राज्यातील हजारो पात्र विद्यार्थ्यांना संकेतस्थळाच्या मंदगती कारभारामुळे प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

Web Title: The medical admission process in the state was disrupted; Website down for the day, registration deadline tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.