चंद्रकांत पाटलांची नाही 'ती' तर भाजपचीच मानसिकता, खासदार प्रियंका चतुर्वेदींचे जोरदार टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 04:38 PM2022-05-26T16:38:16+5:302022-05-26T16:40:31+5:30

शिवसेनेच्या ह्दयात, वागण्यात हिंदुत्त्व आहे, मात्र भाजपचे हिंदुत्त्व हे राजकीय स्वार्थाचे आहे. याच हिंदुत्त्ववादाचा फायदा ते सत्तेसाठी घेतात.

The mentality of BJP, not Chandrakant Patil, MP Priyanka Chaturvedi criticizes BJP for criticizing women | चंद्रकांत पाटलांची नाही 'ती' तर भाजपचीच मानसिकता, खासदार प्रियंका चतुर्वेदींचे जोरदार टीकास्त्र

चंद्रकांत पाटलांची नाही 'ती' तर भाजपचीच मानसिकता, खासदार प्रियंका चतुर्वेदींचे जोरदार टीकास्त्र

Next

सांगली : एका क्षेत्रात पुढे आलेल्या महिलेला घरात जाऊन स्वयंपाक करायला व स्मशानात जायला सांगणारे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देशातील सर्व महिलांचा अवमान केला आहे. भाजप नेत्यांची महिलांप्रती कसी मानसिकता आहे, हे यातून दिसून येते, अशी टीका शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.

त्या म्हणाल्या की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य लाजीरवाणे व महिलांप्रती अवमानकारक आहे. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुढे येत आहेत. राजकारणातही महिलांनी गरुरभरारी घेतली आहे. अशात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर संसदरत्न पुरस्कार जिंकला आहे. त्यांच्या कर्तृत्वावर संसदेने शिक्कामोर्तब केले असताना चंद्रकांत पाटील यांनी त्यांना राजकारण सोडून स्वयंपाक करायला जाण्याचा व स्मशानात जाण्याचा सल्ला दिला. ही केवळ चंद्रकांत पाटील यांचीच नव्हे तर भाजपचीच मानसिकता आहे. या वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी देशातील महिला वर्गाची माफी मागायला हवी.

शिवसेना झुकणार नाही

भाजपकडून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून टार्गेट केले जात आहे. या यंत्रणांना भाजपने राजकीय बनविल्यामुळे लोकांचा या यंत्रणांवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे कुठेही छाापा पडला तर लोकांना त्यामागचे राजकारण कळते. तरीही या दबावतंत्राने शिवसेना कधीच झुकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रवादीशी असलेला संघर्ष सुटेल

इस्लामपूरसह सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर शिवसेना व राष्ट्रवादीत मतभेद असल्याच्या तक्रारी माझ्या कानावर आल्या आहेत. सामंजस्याने व समन्वयाने हा संघर्ष थांबविण्यात येईल, असे चतुर्वेदी म्हणाल्या.

संपर्क अभियानाचा फायदा होईल

शिवसेना संपर्क अभियानातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अडचणी व मते नोंदवून मुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अहवाल देणार आहोत. हे् प्रश्न नक्की सुटतील व संपर्क अभियानातून पक्षाला फायदा होईल, असे चतुर्वेदी म्हणाल्या.

भाजपचे हिंदुत्त्व राजकीय फायद्याचे

शिवसेनेच्या ह्दयात, वागण्यात हिंदुत्त्व आहे, मात्र भाजपचे हिंदुत्त्व हे राजकीय स्वार्थाचे आहे. याच हिंदुत्त्ववादाचा फायदा ते सत्तेसाठी घेतात. देशात सध्या मंदिर व मशिदीचा वाद निर्माण करुन महागाई व बेराेजगारीच्या प्रश्नावरुन लोकांचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका चतुर्वेदी यांनी केली.

Web Title: The mentality of BJP, not Chandrakant Patil, MP Priyanka Chaturvedi criticizes BJP for criticizing women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.