छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधींपासून अनेकांना दिला वैद्यकीय सेवेचा आधार; तेच मिरजेचे 'मिशन हॉस्पीटल' बनले निराधार

By अविनाश कोळी | Published: August 21, 2023 05:20 PM2023-08-21T17:20:31+5:302023-08-21T17:24:25+5:30

वैद्यकीय क्षेत्रातील सुवर्णपान निखळणार की जपले जाणार?

The Mission Hospital at Miraj, which has provided medical care to many people since Chhatrapati Shahu Maharaj, Mahatma Gandhi, is in trouble | छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधींपासून अनेकांना दिला वैद्यकीय सेवेचा आधार; तेच मिरजेचे 'मिशन हॉस्पीटल' बनले निराधार

छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधींपासून अनेकांना दिला वैद्यकीय सेवेचा आधार; तेच मिरजेचे 'मिशन हॉस्पीटल' बनले निराधार

googlenewsNext

अविनाश कोळी

सांगली : छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधींपासून राजे-महाराजे, नाट्य, चित्रपट, संगीत, सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज हस्तींना, सामान्य माणसांना ज्या रुग्णालयाने वैद्यकीय सेवेचा आधार दिला ते ‘मिशन’ रुग्णालय आता अतिदक्षता विभागात दाखल झाले आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील वैद्यकीय क्षेत्रातील हे सुवर्णपान निखळण्याच्या मार्गावर आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ राबवत अनेकांना मरणाच्या दाढेतून काढणाऱ्या या महाकाय हत्तीला आता मरणाच्या दाढेतून कोण काढेल का, असा अस्वस्थ सवाल उपस्थित केला जात आहे.

कॅनेडियन मिशनरी डॉ. विल्यम वॉन्लेस यांनी मिरजेत १८९२ मध्ये स्थापन केलेल्या मिशन रुग्णालयामुळे देशभरात रुग्णसेवेबाबत मिरजेने नावलाैकिक मिळविला. दिल्लीस्थित चर्च ऑफ नॉर्थ इंडियातर्फे संचलन करण्यात येणारे पाचशे खाटांची सोय असलेले वॉन्लेस रुग्णालय गैरव्यवस्थापन व रुग्णसंख्या कमी झाल्याने गेल्या दहा वर्षांत मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहे. सद्य:स्थितीत रुग्णालयावर कोट्यवधींचे कर्ज असून, त्यापैकी सुमारे २० कोटींवर कामगारांची देणी आहेत.

सांगली, मिरजेसह राज्यातील अनेक नामांकित खासगी डॉक्टरांची मिशन हॉस्पिटल ही कर्मभूमी राहिली आहे. जागतिक पातळीवरील नामांकित कंपन्यांच्या मशिनरी, अतिउच्च दर्जाचे व्यवस्थापन, सेवा-सुविधा, दिलासादायी उपचार पद्धत यामुळे हे रुग्णालय एकोणीसाव्या शतकातच देशभर चर्चेत आले होते. असा ऐतिहासिक वारसा लाभलेले हे रुग्णालय रुग्णशय्येवर गेल्यानंतर त्याची सुशृषा करण्याची गरज आहे.

स्वस्तातल्या सोयी

महागड्या वैद्यकीय उपचारांनी त्रस्त असलेल्या सामान्य रुग्णांसाठी वानलेस रुग्णालय मोठा आधार होते. दीडशे रुपयांचा केसपेपर, १२० रुपयांत एक्स-रे, १५० रुपयांत सोनोग्राफीसह माफक दरात इकोकार्डिओग्राफी, हजार ते दीड हजारात मिळणाऱ्या स्पेशल रुम्स यामुळे हेे रुग्णालय सामान्यांसाठी मोठा आधार होते.

रुग्णालयाचे अंतरंग

  • वानलेस रुग्णालय, डॉक्टर, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने यासह मिरज परिसरात ४९ एकर जागेवर रुग्णालयाचा विस्तार आहे.
  • रुग्णालयात सध्यस्थितीत ३६ वेगवेगळे अत्याधुनिक वैद्यकीय विभाग आहेत. एकाच छताखाली बहुतांश वैद्यकीय उपचार तसेच तपासण्यांची सोय या रुग्णालयात आहे.
  • वैद्यकीय सेवेसह नर्सिंग, डीएमएलटी, फिजिओथेरपीचे शिक्षण देणाऱ्या संस्थाही रुग्णालयामार्फत चालविल्या जातात.
  • एकूण ५०० बेडची सोय असलेले हे रुग्णालय आहे.


वऱ्हांड्यात झोपत होते रुग्ण

रुग्णालयाची ख्याती एकेकाळी अशी होती, की खाट फुल्ल झाल्यानंतर रुग्णांच्या इच्छेखातर वऱ्हांड्यात त्यांना गादी अंथरुण उपचार दिले जायचे. सध्यस्थितीत मात्र रुग्णालयाचे बहुतांश विभाग ओस पडले आहेत.

Web Title: The Mission Hospital at Miraj, which has provided medical care to many people since Chhatrapati Shahu Maharaj, Mahatma Gandhi, is in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.