तासगावात सहा कोटी खर्चाचे ‘मल्टिस्पेशालिटी’रुग्णालय धूळ खात, जनतेची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 06:13 PM2023-01-20T18:13:44+5:302023-01-20T18:14:06+5:30
सहा कोटी खर्चून सुसज्ज हॉस्पिटल उभा केले, तरी हॉस्पिटल चालवणार कोण? हॉस्पिटलला डॉक्टर आणि कर्मचारी मिळणार कसे? हे प्रश्न तूर्तास तरी अनुत्तरीत
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव शहरातील सर्वसामान्य रुग्णांची सोय व्हावी यासाठी तासगाव नगरपालिकेच्या वतीने तब्बल सहा कोटी तीस लाख रुपये खर्चून सुसज्ज असे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारले आहे. एक वर्षापूर्वी लोकार्पण होऊनही हे रुग्णालय धूळखात पडून आहे. कोट्यवधी रुपये खर्चून विकासाचा देखावा उभा केला असला तरी प्रत्यक्ष सामान्य जनतेला रुग्णालय सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
तासगाव नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक आणि कस्तुरबा रुग्णालयाच्या माध्यमातून शहरातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचे काम होत होते. मात्र राजकीय उदासीनतेअभावी या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा वृद्धिंगत होण्याऐवजी दोन्ही संस्थांना उतरती कळा लागली. मर्यादित कर्मचाऱ्यांच्या वरती कसेबसे या संस्थांचे काम तासगावात सुरू आहे.
दरम्यान खासदार संजय पाटील यांनी पुढाकार घेत, तासगाव शहरात नगरपालिकेच्या मालकीचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा चंग बांधला. त्यांच्या माध्यमातून सहा कोटी ३० लाख रुपयांचा निधी खर्च करून कस्तुरबा गांधी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी झाली. शंभर बेड, ऑक्सिजन प्लांटसह रुग्णालय उभा राहिले. याचे लोकार्पण १ जानेवारी २०२२ रोजी झाले.
तासगाव शहरात सध्या स्थितीत ग्रामीण रुग्णालयाचा अपवाद सोडल्यास कोणतीही शासकीय रुग्णालय सुसज्ज नाही. ग्रामीण रुग्णालयात १०० बेडची सोय आहे मात्र वैद्यकीय अधिकारी व उपचारासाठी साधने मर्यादित असल्याने सामान्य रुग्णांना सांगली किंवा मिरज येथील शासकीय रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
कोरोना काळात हे रुग्णालय तात्काळ सुरू व्हावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे यांनी अनेकवेळा आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या होत्या. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यामुळे पुन्हा हे रुग्णालय सुरू करण्याचे नाव कोणीच घेतले नाही. त्यामुळे सहा कोटी खर्चून सुसज्ज हॉस्पिटल उभा केले, तरी हॉस्पिटल चालवणार कोण? हॉस्पिटलला डॉक्टर आणि कर्मचारी मिळणार कसे? हे प्रश्न तूर्तास तरी अनुत्तरीत आहेत.