शिराळ्यातील खुनाचे गुढ अखेर उकलले: मृत पलूसचा; भाच्यासह पत्नी-मुलीस अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:14 PM2024-06-01T23:14:09+5:302024-06-01T23:14:35+5:30
फेब्रुवारीत मृतदेह बॅगेतून टाकला
घनशाम नवाथे/ सांगली : शिराळा येथे बॅगेत मृतदेह सापडलेल्या प्रकरणाचे गुढ अखेर बाराव्या दिवशी उकलले गेले. बॅगेतील मृतदेह बेपत्ता राजेश वसंतराव जाधव (वय ५३, रा. पलूस) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. राजेश हा व्यसनाधीन होता. पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. त्यामुळे मृत राजेशचा भाचा देवराज उर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे (वय २४, रा. शेवाळेवाडी, ता. कराड), पत्नी शोभा, मुलगी साक्षी या तिघांनी फेब्रुवारी महिन्यात गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह बॅगेत कोंबून शिराळा येथे टाकल्याचे स्पष्ट झाले.
खुनाच्या तपासाची माहिती देताना पोलिस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, दि. २० मे रोजी सकाळी ९.३० वाजता शिराळा येथील आयटीआय ते नाथ मंदिरकडे जाणाऱ्या शिराळा बायपास रस्त्यावर साकव पुलाच्या बेवारस बॅग आढळली. या बॅगेत प्रेत नायलॉन दोरीने गळ्यास व शरीरास बांधून सतरंजीत गुंडाळून टाकल्याचे तपासात दिसले. मृतदेह पूर्ण सडल्यामुळे केवळ सांगाडा राहिला होता. मृतदेह पुरूषाचा की स्त्रीचा हे ओळखणे कठीण होते. मृतदेहाजवळ ओळखीचा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे तपास आव्हानात्मक होता.
प्रवासी बॅग, मृताच्या अंगावरील कपडे यावरून मृताची ओळख पटवण्यासाठी बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास सुरवात केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणसह शिराळा पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाने खोलवर तपास सुरू केला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणी प्रवासी बॅगा बनवणाऱ्या कंपनीची माहिती घेतली. याचा तपास करताना एका कंपनीतील १६ बॅगांपैकी एक बॅग पलूस येथे विक्रीस आल्याची माहिती मिळाली. बॅग विक्रेत्याकडून माहिती घेऊन रेखाचित्र बनवले. त्या आधारे तपास सुरू असताना पलूस पोलिस ठाण्यात बेपत्ता नोंद असलेल्या राजेश जाधव यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. या चौकशीत विसंगती आढळली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. तेव्हा जाधव यांचा भाचा देवराज शेवाळे, पत्नी शोभा, मुलगी साक्षी या तिघांनी खुनाची कबुली दिली.
अधीक्षक घुगे म्हणाले, मृत राजेश हा दारूच्या आहारी गेला होता. कामधंदा काही न करता घरात रोज शिवीगाळ, मारहाण करत होता. त्यामुळे पत्नी, मुलगी आणि भाचा या तिघांनी २१ फेब्रुवारी रोजी राजेश याचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह बॅगेत टाकला. भाचा देवराज याने दुचाकीवरून मृतदेह शिराळा हद्दीत आणून टाकला. तब्बल तीन महिने बॅग तेथेच होती. कोणीतरी बॅग कापल्यानंतर आतील हाडे बाहेर येऊन दुर्गंधी पसरल्यामुळे खुनाचा प्रकार पुढे आला.
.......
तपास पथकाला बक्षीस-
अधीक्षक घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक मंगेश चव्हाण, शिराळ्याचे निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, प्रवीण साळुंखे, युवराज सरनोबत, अनिता मेणकर, सिकंदर श्रीवर्धन, उपनिरीक्षक जयनाथ चव्हाण, गणेश खराडे, कुमार पाटील, कर्मचारी महेश गायकवाड, कालिदास गावडे, नितीन यादव, संदीप पाटील, शरद जाधव, शरद बावडेकर, प्रशांत देसाई, अमर जाधव, शशिकांत शिंदे, शरद पाटील, राहुल पाटील, सुनिल पाटील, नागराज मांगले यांनी गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केली. या पथकाला तपासाबद्दल बक्षीस जाहीर केले.
....
पलूसला आलेल्या बॅगेवरून छडा-
मुंबई येथील गुड लक कंपनीतून १६ ट्रॅव्हल बॅग विकल्या गेल्या होत्या. यात जांभळ्या रंगाच्या चार बॅग होत्या. जांभळ्या रंगाच्या तीन बॅग पुणे भागात तर एक बॅग पलूस येथे विक्री झाल्याची माहिती तपासात मिळाली. बॅग खरेदी करणाऱ्याचे रेखाचित्र तयार केले. तशातच पलूस येथून एक व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती सापडली. त्यावरून गुढ उकलले गेले.