महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अंकुश ठेवण्याची गरज, तस्करांना मिळतेय अभय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 02:38 PM2022-02-02T14:38:13+5:302022-02-02T14:39:10+5:30
मिरज-म्हैसाळ हा कर्नाटकात जाणार महत्त्वाचा रस्ता. मिरज ग्रामीण पोलीसांनी यावर अंकुश ठेवण्याची गरज.
म्हैसाळ : सुशांत घोरपडे
महात्मा गांधी पोलीस व वनविभागाने एकत्रितरीत्या स्टिंग आँपरेशन करत तब्बल अडीच कोटी रूपयाची होणारी रक्तचंदनाची तस्करी पकडत कारवाई केली. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर होणाऱ्या तस्करी बद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. मिरज ग्रामीण पोलीसांनी यावर अंकुश ठेवण्याची गरज आहे.
मिरज-म्हैसाळ हा कर्नाटकात जाणार महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या मार्गावरून दररोज हजारो वाहने प्रवास करीत असतात. या दरम्यान कर्नाटक पोलिसांनी तपासणीसाठी चेक पोस्ट उभा केले आहे. येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी केली जाते. मात्र महाराष्ट्र दरवाजे खुले असल्याने किंबहुना येथे महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात नसल्याने खुलेआम पणे वाहतूक केली जाते.
रात्रीच्या वेळी चंदन, गुटखा, शस्त्रे यांची तस्करी राजरोसपणे होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगली जिल्ह्यात एखादा मोठा गुन्हा, खुन असे प्रकार झाल्यास सीमेवर महाराष्ट्र पोलिसांकडून नाकाबंदी किंवा तंबू मारून तपासणी केली जाते. परत एखादा गुन्हा घडला किंवा आंदोलन असले की मगच पुन्हा पोलिसांचा फौज फाटा सीमेवर तैन्यात करण्यात येतो.
त्यामुळे या मार्गावरून अवैद्य व्यवसाय करणारे, तस्करी करणारे वाहनधारक यांची चलती वाढली आहे. याचाच फायदा घेऊन अवैध तस्करी करणारे मध्यरात्री तस्करी करत आहेत. महाराष्ट्र पोलीसांनी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक गाडीवर करडी नजर ठेवल्यास अनेक बाबी समोर येतील.
..तर अनेक गुन्हे उघडकीस येतील
महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर कर्नाटकातून अनेक गाड्या रात्री प्रवास करतात. या गाड्यावर मिरज ग्रामीण पोलीसांची करडी नजर असणे गरजेचे आहे. कर्नाटकातून येणाऱ्या गाड्याची तपासणी केल्यास अनेक गुन्हे उघडकीस येतील.
कारवाई होणे गरजेचे
रात्रीच्या वेळी प्रवास करताना अनेक वाहनधारक मद्यप्राशन करून भरधाव वेगाने गाडी चालवतात. त्यामुळे रात्रीच्या पेंट्रोलींग ला अशा चालकावर कारवाई होणे गरजेचे आहे.
दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
महाराष्ट्र -कर्नाटक सीमेचा फायदा घेत या भागात महाराष्ट्रतून-कर्नाटकात व कर्नाटकातून महाराष्ट्रात दुचाकी चोरट्यांनी या पूर्वी ही धुमाकूळ घातला आहे.अशा किती चोरट्याच्या वर कारवाई झाली हे तपासणे गरजेचे आहे.