Sangli: प्रदूषणाच्या आडून 'वसंतदादा' बंद पाडण्याचा काही नेत्यांचा डाव, विशाल पाटील यांचा गंभीर आरोप
By अशोक डोंबाळे | Published: September 29, 2023 06:54 PM2023-09-29T18:54:53+5:302023-09-29T18:55:30+5:30
जिल्हा बँकेचे १७.८० कोटींचे कर्ज शिल्लक
सांगली : येथील वसंतदादा साखर कारखाना सुरळीत चालूच नये, यासाठी काही नेत्यांकडून कुरघोड्यांचे राजकारण चालू आहे. कृष्णा नदीतील मृत माशांना अनेक कारखाने जबाबदार असताना वसंतदादा कारखान्यावर ठपका ठेवून डिस्टिलरी बंद पाडली. प्रत्येक गोष्टीत वसंतदादा कारखाना अडचणीत आणून बंद पाडण्यासाठी काही नेत्यांकडून खेळी आखली जात आहे, असा आरोप वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी केला.
वसंतदादा कारखान्याची सभा शुक्रवारी झाली. यावेळी विशाल पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, अनेक संकटांवर मात करून कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे. कारखाना भाड्याने दिल्यापासून जिल्हा बँकेचे केवळ १७ कोटी ८० लाख ९० हजार रुपये कर्ज थकीत आहे. वर्षभरात कारखाना बँकेकडून कर्जमुक्त होणार आहे. कामगार, बँका, शेतकऱ्यांसह अन्य काही देणी थकीत आहेत. या देण्यातूनही दोन वर्षांत कारखाना कर्जमुक्त होऊन सभासदांचा होणार आहे. कारखाना दर्जेदार चालविणार आहे. कारखाना सभासदांचा झाल्यानंतर अन्य कारखान्यांपेक्षा वसंतदादा कारखाना १०० ते २०० रुपये जादा दर देणार आहे.
अनेक आर्थिक अडचणींवर मात करून कारखाना चालवत आहे. तरीही काही नेते कारखाना बंद पाडण्याच्याच प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी कृष्णा नदीचे प्रदूषण वसंतदादा कारखान्यामुळे झाल्याचा आरोप करून डिस्टिलरी बंद पाडली. वास्तविक पाहता सांगलीत कृष्णा नदीत मासे मरण्यापूर्वी भिलवडीच्या वरही मासे मेले होते. यावेळी प्रदूषण अधिकाऱ्यांनी कारवाईची तत्परता दाखविली नाही. दूधगाव येथे वारणा नदीतही मासे मेले होते. यावेळीही कारवाई झाली नाही. उलट वसंतदादा कारखाना प्रदूषण होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहे. तरीही वसंतदादा कारखान्यावर तत्काळ कारवाई होते, अन्य कारखान्यांवर मात्र होत नाही, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी उपाध्यक्ष सुनील आवटी, अमित पाटील, यशवंतराव पाटील, विक्रमसिंह पाटील, जिनेश्वर पाटील, दौलतराव शिंदे, शिवाजी पाटील, आदींसह संचालक, सभासद, शेतकरी उपस्थित होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले.
खोटे ओळखपत्र आणल्यास कारवाई
दसरा ते दिवाळीपर्यंत सभासदांना साखरचे वाटप करण्यात येणार आहे. ओळखपत्र असणाऱ्यांनाच साखर देणार आहे. दसऱ्यापूर्वी दहा दिवस ज्या सभासदांना यापूर्वी साखर मिळाली नाही, त्यांना ती देण्यात येणार आहे. खोटे ओळखपत्र घेऊन येणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असा इशाराही विशाल पाटील यांनी दिला आहे.