सांगली रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म वाढणार, पण भिंतीमुळे विस्तारीकरण फसणार
By अविनाश कोळी | Published: September 9, 2023 06:45 PM2023-09-09T18:45:56+5:302023-09-09T18:46:46+5:30
‘रेड सिग्नल’ कायम : नव्या गाड्या मिळण्यालाही अडथळे
सांगली : पुणे-लोंढा रेल्वे दुपदरीकरण, विद्युतीकरण प्रकल्पांतर्गत रद्द झालेले सांगलीरेल्वे स्थानकावरील नवे दोन प्लॅटफॉर्म पुन्हा मंजूर झाले आहेत. मात्र, पाचव्या प्लॅटफॉर्मवर मालगाड्यांसाठी भिंत उभारली जाणार असल्याने विस्तारीकरणाचा हेतू सफल होणार नाही. याशिवाय नव्याने रेल्वे गाड्या मंजुरीलाही अडथळे निर्माण होणार आहेत. त्यामुळे पाचव्या प्लॅटफॉर्मवरील भिंत बांधण्याची रेल्वे प्रशासनाची योजना रद्द करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.
सांगलीच्या स्थानकावर अतिरिक्त दोन प्लॅटफॉर्ममुळे दुपदरीकरण व विद्युतीकरणाचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे. कोल्हापूरपासून पुण्याकडे किंवा कर्नाटकातील गाड्यांचा पुण्याकडील प्रवास किंवा पुण्याकडून दक्षिणेकडील प्रवास जलदगतीने होणार आहे. मात्र, नवे दोन प्लॅटफॉर्मना सुरुवातीला रद्द करुन आता पुन्हा नव्याने मंजुरी दिली आहे. याचा आनंद व्यक्त केला जात असला तरी पाचव्या प्लॅटफॉर्मचा वापर हा केवळ मालगाड्यांपुरताच होणार असल्याने ही विस्तारीकरण योजना पूर्णपणे सफल होणार नाही. अडचणी पुन्हा वाट्याला येणार आहेत.
रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन करताना या अतिरिक्त प्लॅटफॉर्मचा मोठा लाभ प्रवाशांना होणार आहे. क्रॉसिंगची झंझट आता होणार नाही. पण, पाचवा प्लॅटफॉर्म हा प्रवासी गाड्यांसाठी उपयोगात येणार नाही. मालगाड्यांसाठी तो प्रशासनाने राखीव ठेवला आहे. त्यामुळे याठिकाणी भिंत उभी केली जाईल. प्रवाशांना याठिकाणी उतरता येणार नाही.