Sangli: रेल्वेखाली उडी घेऊन तरुण संपवणार होता जीवन, पोलिसांनी वाचविले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 03:28 PM2024-07-20T15:28:38+5:302024-07-20T15:33:04+5:30
नातेवाइकांनी मोबाइल कॉलवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. सांगलीचा पत्ता समजल्यानंतर विश्रामबाग पोलिसांना कळविले.
सांगली : पिंपरी-चिंचवड येथील चिखली पोलिस ठाणे हद्दीतून तो बेपत्ता झाला होता. त्याचा शोध सुरू होता. फिरतफिरत तो सांगलीत आला होता. सांगलीत रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करणार असल्याचे नातेवाइकांना फोन करून सांगितले. नातेवाइकांनी मोबाइल कॉलवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. सांगलीचा पत्ता समजल्यानंतर विश्रामबाग पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून गुरुवारी त्याला सांगली रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. त्यानंतर शुक्रवारी नातेवाइकांच्या ताब्यात दिले.
अधिक माहिती अशी, कोंडीराम अर्जुन जेधे (वय २५, मूळ रा. बीड) हा सध्या रूपीनगर (तळवडे, पुणे) येथे राहत होता. दि. ६ रोजी तो राहत असलेल्या खोलीतून बाहेर पडला. त्यानंतर परतला नाही. त्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्याचे नातेवाईक योगेश येवले (रा. पाटोदा, जि. बीड) यांनी दि. ८ रोजी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याचा शोध सुरू होता. फिरतफिरत तो सांगलीत आला होता. गुरुवारी त्याने नातेवाईक येवले यांना कॉल करून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्याच्या मोबाइल लोकेशनवरून विश्रामबाग पोलिस ठाण्याशी संपर्क साधला व त्याची माहिती देण्यात आली.
विश्रामबाग पोलिस ठाण्यातील अंमलदार रोहित बन्ने व श्रीधर फुके यांनी कोंडीराम याचा शोध सुरू केला. मोबाइल लोकेशनवरून शोध सुरू असतानाच त्याने मोबाइल बंद केला. तेव्हा बन्ने यांनी चिखली पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकांकडून कोंडिरामचा फोटो मागून घेतला. फोटोवरून सांगली रेल्वेस्थानकावर शोध घेऊन कोंडिरामला ताब्यात घेतले. तेव्हा तो नशेत असल्याचे आढळून आले. रेल्वेखाली उडी घेण्यापासून त्याला रोखले.
नातेवाइकांच्या ताब्यात
कोंडिरामला ताब्यात घेतल्यानंतर चिखली पोलिस ठाण्यामार्फत नातेवाइकांना कळविले. शुक्रवारी नातेवाइक सांगलीत आल्यानंतर त्याला त्यांच्या ताब्यात दिले. नातेवाइकांनी पोलिस अंमलदार बन्ने व फुके यांचे आभार मानले.