सांगलीत ३७ लाखांच्या फसवणूकप्रकरणी ‘वेफा’च्या संचालकाचा पोलीस ताबा घेणार
By शरद जाधव | Published: September 17, 2022 09:12 PM2022-09-17T21:12:55+5:302022-09-17T21:14:13+5:30
सहा जणाविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली : जादा परताव्याच्या आमिषाने ३७ लाख ४४ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या वेफा मल्टिट्रेड प्रा. लि. कंपनीचा संचालक ज्ञानेश्वर कृष्णदेव हिप्परकर (रा. गोंधळेवाडी, ता. जत) याचा आर्थिक गुन्हे शाखा आता ताबा घेणार आहे. हिप्परकर याच्यासह सहा जणाविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील सर्कीट हाऊसजवळील एका बंगल्यात वेफा मल्टिट्रेड प्रा. लि. ही कंपनी सुरू करण्यात आली होती. गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी रकम घेतली होती.
३७ लाख ४४ हजार रुपयांच्या फसवणूकप्रकरणी विद्याधर भूपाल माणगावे (रा. शिरढोण, ता. शिरोळ) यांनी वेफा कंपनीचे संचालक ज्ञानेश्वर कृष्णदेव हिप्परकर (रा. गोंधळेवाडी, ता. जत), प्रकाश काकासाहेब लांडगे (रा. करगणी, ता. आटपाडी), प्रशांत बंडोपंत ओतारी (रा. गावभाग, सांगली), रामहरी जगन्नाथ पवार (रा. बुधगाव), बबन लक्ष्मण मस्कर (रा. समडोळी), निशा नितीन पाटील (रा. अभयनगर, सांगली) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांनी प्रशांत ओतारी व बबन मस्कर यांना अटक केली होती.
या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे आता संचालक हिप्परकर याचा ताबा सोमवारी घेण्यात येणार आहे. दरम्यान, वेफा मल्टिट्रेड कंपनीने अजूनही कोणाची फसवणूक केली असल्यास अशा गुंतवणूकदारांनी तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे