पडक्या, गळक्या इमारतीत रुग्णसेवा, भोसे आरोग्य केंद्रातील दुरावस्था; रुग्णांना पाठवलं जातय सांगली, मिरजेला
By संतोष भिसे | Published: July 27, 2023 06:06 PM2023-07-27T18:06:51+5:302023-07-27T18:07:25+5:30
सांगली : भोसे (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती लागली आहे. छतामधून गळणाऱ्या पावसातच रुग्णांवर उपचार करावे ...
सांगली : भोसे (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला गळती लागली आहे. छतामधून गळणाऱ्या पावसातच रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. त्याचा गंभीर परिणाम रुग्णसेवेवर झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीत सहा-सात महिन्यांपासून दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यासाठी सुमारे ५५ लाख रुपये खर्च केला जात आहे. या काळात रुग्णसेवा कर्मचारी निवासामध्ये सुरु ठेवण्यात आली आहे. रुग्णांना तपासणे, किरकोळ उपचार करणे ही कामे जुन्या निवासी इमारतीतच केली जात आहेत. या निवासी इमारती अनेक वर्षांपासून वापराविना आहेत, त्यामुळे त्यांचीही दुर्दशा झाली आहे. छताच्या स्लॅबचे ढलपे निखळून पडले आहेत. सळ्या बाहेर दिसत आहेत. त्यातून पावसाचे पाणी झिरपत आहे. दरवाजे तुटले असून खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहेत. अतिशय कोंदट व अपुऱ्या जागेत रुग्णसेवा सुरु आहे. रुग्णांना छत्री डोक्यावर घेऊनच आरोग्य केंद्रात यावे लागत आहे.
पुरेशी इमारत नसल्याने फक्त बाह्यरुग्ण विभाग सुरु आहे. प्रसूती किंवा अन्य उपचारांसाठी रुग्णांना दाखल करता येत नाही, त्यांना मिरज किंवा सांगलीला पाठवले जात आहे. पडक्या व गळक्या इमारतीत काम करावे लागत असल्याने डॉक्टर व कर्मचारीही हैराण आहेत. डोक्यावरच्या छताचा तुकडा कधी पडेल याचा नेम नसल्याने जीव मुठीत धरुन काम करावे लागत आहे. औषधे व उपकरणे पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.
कामही गतीने पूर्ण करण्याची मागणी
आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीतील काही खोल्यांचे काम पूर्ण झाले असून, तेथे कामकाज सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. उर्वरित कामही गतीने पूर्ण करण्याची मागणी आहे.