सांगली जिल्हा कारागृहातून पळालेला बंदी पोलिसांच्या ताब्यात
By शरद जाधव | Published: November 18, 2023 03:45 PM2023-11-18T15:45:06+5:302023-11-18T15:46:10+5:30
सांगली : ऐन दिवाळीच्या धामधुमीत जिल्हा कारागृहातून भिंतीवरून उडी मारून पसार झालेल्या बंदीला पोलिसांनी जेरबंद केले. सदाशिव अशोक सनदे ...
सांगली : ऐन दिवाळीच्या धामधुमीत जिल्हा कारागृहातून भिंतीवरून उडी मारून पसार झालेल्या बंदीला पोलिसांनी जेरबंद केले. सदाशिव अशोक सनदे (वय २५, रा. मिसळवाडी, आष्टा) असे संशयिताचे नाव आहे. सोमवार, दि. ६ रोजी तो पसार झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने घराजवळूनच त्याला ताब्यात घेतले.
अत्याचार प्रकरणात न्यायालयीन बंदी असलेला सनदे हा दुपारच्या सुमारास कारागृहातील स्वयंपाक खोलीमध्ये गेला होता. या ठिकाणी कोणीही नसल्याची संधी साधत भिंतीवरून उडी मारून पटवर्धन हायस्कूलजवळून तो पसार झाला होता. आष्टा पोलिसांत त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आहे.
सनदे पसार झाल्यानंतर पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. पथकाला माहिती मिळाली बंदी सनदे हा त्याच्या घरी मिसळवाडी येथे आला आहे. त्यानुसार पथकाने त्याच्या घराजवळ सापळा लावला. पोलिसांना तो आढळून येताच त्यास ताब्यात घेतले. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, अरुण पाटील, सुनील जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.