मिरजेतील खराब रस्त्यांची समस्या आंतरराष्ट्रीय पातळीवर, दोघे तरुण समाजमाध्यमावर व्हायरल
By श्रीनिवास नागे | Published: December 1, 2022 05:31 PM2022-12-01T17:31:32+5:302022-12-01T17:32:05+5:30
मिरजेतील खराब रस्त्यांची समस्या दोन तरूणांनी कतारच्या फिफा विश्वचषकातून मांडली आहे.
सांगली : कतार येथे काम करणाऱ्या मिरजेतील इम्तियाज पैलवान व राजू तांबोळी या दोघा तरुणांनी कतारमध्ये वर्ल्डकप सामन्याच्या वेळी फुटबॉल मैदानाच्या गॅलरीत मिरजेतील खराब रस्त्यांची समस्या उपस्थित केली. तेथे उपस्थित पोलिसांनी पैलवान व तांबोळी यांच्याकडील पोस्टर काढून घेतले. खराब रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्याच्या त्यांच्या या अनोख्या प्रयत्नाचे मिरजेतील नागरिकांनीही कौतुक केले. मिरजेतील इम्तियाज पैलवान (रा. बोकड चौक) व राजू तांबोळी (रा. शास्त्री चौक, मिरज) हे दोघे तरुण आखाती देशात कतार येथे फर्निचर कंपनीत काम करीत आहेत. मिरजकर असल्याने त्यांचेही मिरजेतील दैनंदिन घडामोडींकडे लक्ष आहे. मिरजेतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यासाठी विविध पक्ष, संघटना व नागरिक आंदोलने करीत आहेत. इम्तियाज पैलवान महिन्यापूर्वीच मिरजेत घरी आल्यानंतर मिरजेतील रस्ते व धूळ त्यांनी अनुभवली. यामुळे ऑस्ट्रेलिया व डेन्मार्क संघाचा सामना पाहण्यास जाताना पैलवान व तांबोळी या दोघांनी या मिरजेतील रस्त्यांच्या समस्येला वाचा फोडण्याचे ठरविले.
इम्तियाज पैलवान यांनी ‘आय लव्ह मिरज, मला अभिमान आहे मिरज शहराचा’,‘काही राजकीय पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मिरजेतील रस्ते होत नाही आहेत. मिरजेतील रस्ते कधी होणार?’ असा मजकूर असलेले पोस्टर व व्यंगचित्रांची लॅपटॉपवर प्रिंट काढली. फुटबॉल सामना सुरू असताना दोघांनी प्रेक्षक गॅलरीत पोस्टर दाखवत मिरजेतील रस्त्यांची समस्या मांडून मोबाइल कॅमेऱ्याने फोटो व व्हिडीओ चित्रण केले. कतारमध्ये अशा कृत्यांना बंदी असल्याने पोलिसांनी दोघांकडील पोस्टर काढून घेऊन त्यांच्या मोबाइलमधील फोटो व व्हिडीओ डिलीट केले. मात्र, यावेळी इतर प्रेक्षकांनी त्यांच्या मोबाइलमध्ये घेतलेले फोटो व व्हिडीओ मिळवून पैलवान व तांबोळी यांनी समाजमाध्यमावर व्हायरल केले.
पालकमंत्र्यांनी तरी लक्ष द्यावे
इम्तियाज पैलवान याच्याशी संपर्क साधला असता, कतार व आखाती देशातील रस्ते व तेथील विकास पाहून मिरजेची लाज वाटते, अशी भावना त्याने व्यक्त केली. मिरजेचा मला अभिमान आहे. मात्र, राजकीय पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मिरजेतील रस्ते रखडले आहेत. मिरजेचे लोकप्रतिनिधी असलेल्या पालकमंत्र्यांनी तरी याकडे लक्ष द्यावे, यासाठी पोस्टर दाखवल्याचे इम्तियाजने सांगितले.