Sangli: पुणे-बेंगलुरू हरित महामार्ग योगेवाडी औद्योगिक वसाहतीला जोडणार
By संतोष भिसे | Published: March 9, 2024 05:17 PM2024-03-09T17:17:17+5:302024-03-09T17:17:31+5:30
तासगावच्या विकासाला चालना, प्रकल्पाचा अहवाल केंद्राकडे
संतोष भिसे
सांगली : प्रस्तावित पुणे बेंगलुरू हरित महामार्ग जिल्ह्यातील तासगाव, विटा, कवठेमहांकाळ व मिरज तालुक्यांतून जात आहे. तो योगेवाडी (ता. तासगाव) औद्योगिक वसाहतीला जोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महामार्गाच्या माध्यमातून ही वसाहत वेगाने विकसित करण्याचे शासनाचे नियोजन आहे.
पुणे ते बेंगलूरूदरम्यान नवा हरित महामार्ग विकसित होत आहे. सध्याच्या पुणे-बेंगलुरू महामार्गासाठी तो पर्यायी असेल. या बहुचर्चित महामार्गाचा प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर झाला आहे. भारतमाला प्रकल्पातून हा महामार्ग प्रस्तावित आहे. त्यासाठी ४० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यांतून त्याचा प्रवास होईल. सांगली जिल्ह्यात खानापूर, तासगाव, मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यांतून जाईल. सध्याच्या पुणे-बेंगलुरू महामार्गापेक्षा तो लांबीला ९३ किलोमीटरने कमी आहे.
हा हरित महामार्ग योगेवाडी औद्योगिक वसाहतीला जोडण्याचे नियोजन आहे. यामुळे या भागाच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. योगेवाडी वसाहतीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरून नवा महामार्ग जातो. हे अंतर थेट महामार्गाने जोडल्यास उद्योगांना चालना मिळेल असा शासनाचा विचार आहे. वसाहतीचे काम येत्या काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा महामार्ग हायवे कॉरिडॉरला जोडण्याची मागणी होत होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना देऊ, असे स्पष्ट केले आहे. योगेवाडी वसाहत महामार्गाने जोडली गेल्यास संपूर्ण तासगाव तालुक्याच्या विकासालाच चालना मिळणार आहे. कृषी आधारित उद्योग येथे येऊ शकतील. सांगली, मिरज वसाहतीत सध्या मोठ्या प्रकल्पांसाठी पुरेशी जागा शिल्लक नाही. औद्योगिक विकासाचा हा केंद्रबिंदू महामार्गामुळे योगेवाडी वसाहतीकडे वळवता येऊ शकतो.
हरित महामार्ग खानापूर तालुक्यातील माहुली, वलखड, वेजेगाव, भेंडवडे, साळशिंगे, जोंधळखिंडी, माधळमुठी, वासुंबे, रेणावी, रेवणगाव, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द या गावांतून जातो. तासगाव तालुक्यातील कचरेवाडी, नरसेवाडी, किंदरवाडी, विजयनगर, पेड, मोराळे, मांजर्डे, शिरगाव, हातनोली, बस्तवडे, सावळज, वज्रचौंडे, मणेराजुरी आणि गव्हाणमधून जातो. कवठेमहांकाळ तालुक्यात बोरगाव, मळणगाव, हरोली, देशिंग, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी, रामपूरवाडी आणि कोगनोळीमध्ये येथून, तर मिरज तालुक्यातील सलगरे, बेळंकी आणि संतोषवाडी या गावांतून जातो. ही गावे थेट योगेवाडी वसाहतीला जोडली जातील.
योगेवाडीचा थेट पुण्याशी व्यवहार
७४५ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आठ मार्गिकांचा असून, पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गापेक्षा रुंद म्हणजे १०० मीटर असेल. काँक्रीटऐवजी डांबरीकरण होणार असून, ताशी १२० किलोमीटर गतीने प्रवास करता येईल. पुण्यात वरवे बुद्रुकपासून प्रारंभ होऊन सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून जाईल. योगेवाडी वसाहतीला जोडल्यानंतर ही वसाहत पुण्यातील उद्योगांशी थेट जोडली जाणार आहे.