रेल्वे महाव्यवस्थापक म्हणतात...मिरजेचा पूल पाडावाच लागेल
By अविनाश कोळी | Published: January 24, 2024 07:31 PM2024-01-24T19:31:35+5:302024-01-24T19:32:41+5:30
पर्यायी व्यवस्था हवी असेल तर ९ कोटींची गरज
सांगली : मिरजेतील कृपामयीजवळचा रेल्वे उड्डाणपूल कोणत्याही परिस्थितीत पाडावाच लागेल. त्याला पर्यायी व्यवस्था करायची झाल्यास राज्य शासनाकडून ९ कोटी रुपये मिळायला हवेत, असे मत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी व्यक्त केले.
राम करण यादव यांनी बुधवारी सांगली रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते, रेल्वे प्रवासी संघटनांचे पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेतली. मिरजेच्या रेल्वे उड्डाणपुलाबाबत विचारणा केल्यानंतर यादव म्हणाले की, संबंधित पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले असून त्यात पुलाची क्षमता घटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा पूल पाडावाच लागणार आहे. पर्यायी पुलासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पर्यायी व्यवस्था करायची झाल्यास महाराष्ट्र शासनाकडून ९ कोटी रुपयांची तरतूद करायला हवी. सर्वांनी यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
चिंतामणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूलाचे काम संथगतीने सुरू असल्याची तक्रार नागरिक जागृती मंचने केली. यावर यादव म्हणाले की, संबंधित ठेकेदाराला एप्रिलअखेरची मुदत दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत एप्रिलमध्ये पुलाचे काम पूर्ण होईल. त्याबाबत कोणतीही शंका नाही.
सांगली स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर चार आणि पाचवर पादचारी पूल उभारण्याची मागणी मंचने केली होती. त्याची दखल घेत पादचारी पूल मंजूर केल्याबद्दल मंचच्या वतीने यादव यांचे आभार मानण्यात आले.
सांगलीमध्ये गाड्यांना थांबा देण्याची मागणी
सांगलीतील सतीश साखळकर, प्रमोद पाटील, अमर निंबाळकर, शंभुराज काटकर, सुरेश साखळकर, शरद शहा, विजय शहा, राम काळे, डॉ. दिलीप पटवर्धन यांनी यादव यांच्याशी सांगली स्थानकावरील विकासकामांबाबत चर्चा केली. सांगलीमध्ये जादा गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. मिरज स्थानकाच्याबरोबरीने सांगली स्थानकाचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली.