सांगली जिल्ह्यातील 'इतक्या' सहकारी दूध संस्थांची नोंदणी रद्द होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 05:40 PM2023-09-23T17:40:00+5:302023-09-23T17:40:36+5:30
शिराळा तालुक्यातील सर्वाधिक संस्था
सांगली : जिल्ह्यातील अवसायनात गेलेल्या ८५१ दूध उत्पादक, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, मत्स्य संस्थांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सहकार विभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. येत्या ६ ऑक्टोबरला या सर्व संस्थांची संयुक्त अंतिम सभा बोलावण्यात आली असून तोपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सहकारी संस्था (दुग्ध)च्या सहाय्यक निबंधक दीपा खांडेकर यांनी याबाबतची नोटीस शुक्रवारी प्रसिद्ध केली. जिल्ह्यातील अवसायनात गेलेल्या ८५१ सहकारी दुग्ध व अन्य संस्थांची अंतिम सभा मिरजेच्या शासकीय दूध योजनेच्या इमारतीत ६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता आयोजित केली आहे. या सभेपर्यंत संस्थांचे सभासद, ऋणको, धनको यांनी काही आक्षेप असल्यास नोंदवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सहा हजारावर संस्था
जिल्ह्यात दुग्ध व अनुषंगिक सहकारी संस्थांची एकूण संख्या सध्या ६ हजार ७ इतकी आहे. आता ८५१ संस्थांची नोंदणी रद्द केली जाणार आहे.
तालुकानिहाय नोंदणी रद्द प्रक्रियेतील संस्था
तालुका - संस्था
आटपाडी - १३०
कडेगाव - ६३
क.महांकाळ - ९०
विटा - ३१
जत तालुका - ८७
पलूस - ११
मिरज - ९२
वाळवा - १३८
शिराळा - १४०
अशी होणार नोंदणी रद्द
या संस्थांच्या संयुक्त सभेला संबंधित संस्थांच्या सभासदांना निमंत्रित केले आहे. तसेच ज्यांना संस्थांविषयी काही आक्षेप आहेत त्यांनाही समक्ष हजर राहून ते नोंदविता येऊ शकतात. त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर या संस्थांच्या नोंदणी रद्दच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.