दरोडेखोरांनी तरुणाचे हात-पाय बांधून पावणेचार लाखांचा ऐवज लुटला, सांगलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 05:39 PM2022-12-24T17:39:51+5:302022-12-24T17:40:14+5:30

सांगली : शहरातील कर्नाळ रस्त्यावर असणाऱ्या झेंडा चौक येथील घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करीत सहा दरोडेखोरांच्या टोळीने दोन ...

The robbers tied the hands and feet of the young man and robbed him of Rs 4 lakh in sangli | दरोडेखोरांनी तरुणाचे हात-पाय बांधून पावणेचार लाखांचा ऐवज लुटला, सांगलीतील घटना

दरोडेखोरांनी तरुणाचे हात-पाय बांधून पावणेचार लाखांचा ऐवज लुटला, सांगलीतील घटना

googlenewsNext

सांगली : शहरातील कर्नाळ रस्त्यावर असणाऱ्या झेंडा चौक येथील घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करीत सहा दरोडेखोरांच्या टोळीने दोन लाख रुपयांच्या रोकडसह दागिने असा पावणेचार लाख रुपयांचा ऐवज लुटला. दरोडेखोरांना प्रतिकार करणाऱ्या तरुणाचे हात-पाय बांधून त्यांच्या आईला हत्याराचा धाक दाखवत त्यांच्याकडील दागिने लुटण्यात आले. याप्रकरणी वास्तुविशारद आशिष जयकुमार चिंचवाडे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वास्तुविशारद म्हणून काम करणारे आशिष चिंचवाडे हे कुटुंबीयांसह कर्नाळ रस्त्यावरील झेंडा चौक परिसरात राहण्यास आहेत. शुक्रवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास सहा दरोडेखोरांच्या टोळीने त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कडी तोडताना मोठा आवाज झाल्याने चिंचवाडे झोपेतून जागे झाले.

ते बाहेर आले असता दरोडेखोरांनी त्यांचे हात-पाय बांधले आणि त्यांच्या आईला लोखंडी कटरसह हत्याराचा धाक दाखवत त्यांच्याकडील दागिने व दोन लाखांची रोकड लंपास केली. काही वेळातच दरोडेखोरांनी रोकड व ऐवज काढून घेत चिंचवाडे यांचे मोबाइल फोन काढून घेत तेथून पसार झाले. बंगल्यापासून काही अंतरावर त्यांनी हे माेबाइल टाकून दिले. यानंतर आशिष यांनी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

शहरातील गजबजलेल्या भागात दरोड्याचा प्रकार घडल्याने पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यावेळी उपस्थित होते.

हत्याराचा धाक दाखवून लूट

चोरट्यांनी चिंचवाडे यांच्या आईला हत्याराचा धाक दाखवून एक लाख रुपये किमतीचे पाच तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या, ४० हजारांची २१ ग्रॅमची सोन्याची चेन, ५ ग्रॅम वजनाच्या दहा हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, ५ हजार रुपये किमतीचे चांदीचे १०० ग्रॅम वजनाचे पैंजण, करदोडा, छल्ला, निरांजन, ८ हजारांचे ८ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, २० हजारांचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, असा ऐवज लुटल्याचे चिंचवाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

दोन महिन्यांतील दुसरी घटना

दोन महिन्यांपूर्वी ऐन दिवाळीत शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करीत चोरट्यांनी महिलेकडील दागिने लुटले होते. त्यानंतर आता शहरातच पुन्हा दरोड्याचा प्रकार घडला आहे.

Web Title: The robbers tied the hands and feet of the young man and robbed him of Rs 4 lakh in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.