सोरडी जिल्हा परिषद शाळेतील छताचे प्लॅस्टर कोसळले, विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 07:09 PM2022-03-12T19:09:03+5:302022-03-12T19:09:30+5:30
सुदैवाने प्लास्टरचा भाग पुढील बेंचवर पडला. अन्यथा दुर्घटना घडली असती.
संख : जत तालुक्यातील सोरडी येथील निकृष्ट बांधकामामुळे जिल्हा परिषद शाळेतील पहिल्याच्या वर्गखोलीच्या छताचे प्लॅस्टर कोसळले. यात एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. नशीब बलवत्तर म्हणून प्लॅस्टर बेंचच्या पुढील बाजूस पडल्याने विद्यार्थ्यांना मोठी इजा झाली नाही. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता घडली.
आज, शनिवारी असल्याने शाळा सकाळच्या सत्रात साडेसात वाजता भरली होती. इयत्ता पहिलीच्या वर्गात एकूण ४८ मुले होती. यावेळी सकाळी नऊ वाजता वर्ग खोलीच्या स्लॅबचा प्लॅस्टर अचानक कोसळला. यावेळी जोरदार आवाज झाला. सुदैवाने प्लास्टरचा भाग पुढील बेंचवर पडला. अन्यथा दुर्घटना घडली असती.
ही घटना घडताच विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. यात एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. दरम्यान, प्रसंगावधान दाखवत शिक्षकाने विद्यार्थ्यांना तत्काळ व्हरांड्यात जाण्यास सांगितले. त्यामुळे जीवितहानी टळली.