राज्यात रेल्वेगाड्यांची सुरक्षितता इंटरलॉकिंगच्या भरवशावरच!, कोकणाव्यतिरिक्त अन्यत्र कोठेही 'कवच' प्रणाली नाही
By संतोष भिसे | Published: June 5, 2023 04:20 PM2023-06-05T16:20:30+5:302023-06-05T16:20:58+5:30
बालासोर रेल्वे दुर्घटनेमुळे रेल्वेसाठीची कवच सुरक्षाप्रणाली चर्चेत
संतोष भिसे
सांगली : महाराष्ट्रात कोकण रेल्वे वगळता अन्यत्र धावणाऱ्या शेकडो एक्स्प्रेस गाड्यांच्या सुरक्षिततेचा भरोसा इंटरलॉकिंग प्रणालीवरच आहे. महाराष्ट्रात कोकणाव्यतिरिक्त अन्यत्र कोठेही कवच प्रणाली वापरात नाही. इंटरलॉकिंग आणि सिग्नल यंत्रणा वेळोवेळी सक्षम केली जात असल्याने भीषण अपघात सहसा झालेले नाहीत.
बालासोर रेल्वे दुर्घटनेमुळे रेल्वेसाठीची कवच सुरक्षाप्रणाली चर्चेत आली आहे. देशभरातील ६८ हजार किलोमीटर रेल्वेमार्गापैकी अवघ्या १२०० किलोमीटर मार्गावरच ती बसवली आहे. महाराष्ट्रात तर कोठेच नाही. किंबहुना पुणे, मुंबईसारख्या मेट्रो शहरांच्या लोहमार्गांवरही बसवलेली नाही. कोकण रेल्वे धावू लागली, तेव्हा काही ठिकाणी बसवली होती, मात्र सध्या वापरात आहे किंवा नाही याची स्पष्टता नाही. पूर्णत: भारतीय बनावटीची कवच प्रणाली अत्यंत महागडी आहे.
रेल्वेचे इंजिन आणि लोहमार्गावर बसवली जाते. दोन रेल्वे एकाच मार्गावर येतात, तेव्हा दीड किलोमीटर दूर अंतरावरच इंजिनमधील अलार्म वाजू लागतो. त्यानंतरही चालकाच्या लक्षात आले नाही, तर ब्रेकिंग यंत्रणा आपोआप कार्यान्वित होते. रेल्वे सुरक्षित अंतरावर रोखल्या जातात.
प्रवाशांच्या सर्वाधिक सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या रेल्वेने सध्या तरी इंटरलॉकिंग प्रणालीवरच भरवसा ठेवला आहे. आजवर तो यशस्वीही झाला आहे. गाडी कोणत्या लाइनवर घ्यायची याचा निर्णय होताच, त्यानुसार लोहमार्ग हलवला जातो. एका लोहमार्गावरून धावणारी गाडी मुख्य लोहमार्गावर घ्यायची असेल, तेव्हा दोन्ही लोहमार्ग परस्परांना जोडले जातात. ते पूर्णत: जोडले गेल्यावरच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होते.
महाराष्ट्रभरात बहुधा सर्वत्र ही इंटरलॉकिंग प्रणाली बसवण्यात आली आहे. ती १०० टक्के सिद्धही झाली आहे. त्यामुळे गाड्या सुरक्षित धावतात. वंदे भारत, शताब्दी, राजधानी, संपर्कक्रांतीसह अन्य सर्वच लांब पल्ल्याच्या व सरासरी १२० ते १३० किलोमीटर प्रतितास अशा भन्नाट वेगाने धावणाऱ्या रेल्वे इंटरलॉकिंग प्रणालीच्या भरवशावरच बिनधास्त धावतात. प्रवासी निर्धास्तपणे रेल्वेतून प्रवास करू शकतात. बालासोरच्या दुर्घटनेनंतर मात्र कवच प्रणालीची गरज अधोरेखित झाली आहे.
जयसिंगपुरात दोन गाड्या एकाच लाइनवर
जयसिंगपूर स्थानकात सुमारे सहा-सात वर्षांपूर्वी दोन प्रवासी गाड्या एकाच लाइनवर येण्याची घटना घडली होती. सायंकाळी कोल्हापुरातून मिरजेकडे येणारी पॅसेंजर आणि कोल्हापूरकडे जाणारी एक्स्प्रेस एकाचवेळी फलाट क्रमांक एकवर आल्या होत्या. दोहोंच्या इंजिनामध्ये अवघे ५०-१०० फूट अंतर राहिले होते. एक गाडी मागे घेऊन अन्य लाइनवरून सोडण्यात आली होती.