दराचा नाही पत्ता, तरीही कारखान्यांचे हंगाम सुसाट; सांगली जिल्ह्यातील १९ पैकी १४ धुराडी पेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 12:28 PM2022-11-01T12:28:45+5:302022-11-01T12:29:16+5:30
काही कारखान्यांनी दोन ते तीन टप्प्यामध्ये एफआरपी द्यावी लागेल, असे खासगीत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रश्नावरुन कारखाना व संघटना यांच्यात यंदाही संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सांगली : जिल्ह्यातील १९ पैकी १४ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केले आहेत. पाच कारखान्यांचे हंगाम यावर्षीही बंदच राहणार आहेत. वसंतदादा कारखाना चालवत असलेल्या दत्त इंडिया कारखान्याने ऊसदर जाहीर केला आहे; पण उर्वरित कारखान्यांनी दर जाहीर न करताच हंगाम सुसाट सुरू केले आहेत.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याबाबत व्यवस्थापनांनी तयारी केली होती; पण पाऊस आणि दिवाळीमुळे ऊसतोड मजूर वेळेत आले नाहीत. यामुळे दिवाळीनंतरच हंगाम सुरू झाले आहेत. राजारामबापू कारखान्याची साखराळे, वाटेगाव, जत, कारंदवाडी ही युनिट, क्रांती, हुतात्मा, दालमिया (निनाई), विश्वास, मोहनराव शिदे, दत्त इंडिया, सोनहिरा, उदगिरी शुगर, सद्गुरु श्री श्री रविशंकर, श्रीपती शुगर ॲण्ड पॉवर आदी १४ कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत.
यापैकी दत्त इंडियाने प्रतिटन २९६१ रुपये ऊसदर जाहीर केला आहे. उर्वरित एकाही कारखान्याने दराची अधिकृत घोषणा केलेली नाही. शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. काही कारखान्यांनी दोन ते तीन टप्प्यामध्ये एफआरपी द्यावी लागेल, असे खासगीत स्पष्ट केले. त्यामुळे या प्रश्नावरुन कारखाना व संघटना यांच्यात यंदाही संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
५ नोव्हेंबरनंतर ऊस तोडी बंद पाडणार : महेश खराडे
गाड्या अडवणे, कारखाने बंद करणे, टायर फोडणे आदी करण्याची वेळ साखर सम्राटांनी आमच्यावर आणू नये. कारखानदारांनी दि. ४ नोव्हेंबरपर्यंत दर जाहीर करावेत, अन्यथा पाच नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ऊसतोडी बंद पाडण्यात येणार आहेत, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.