सिंचन योजनांना वीज दरवाढीचा ‘शॉक’, पाणीपट्टीही वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 08:22 AM2023-07-26T08:22:37+5:302023-07-26T08:23:34+5:30
वीजबिल भरणे मुश्कील
प्रताप महाडिक, लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव (जि. सांगली) : ताकारी, टेंभू, म्हैसाळसह राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनांना एप्रिलपासून वीज दरवाढीचा ‘शॉक’ बसला आहे. पूर्वी प्रतियुनिट १ रुपया १६ पैसे दराने होणारी वीजबिलांची आकारणी एप्रिलपासून ५ रुपये २६ पैसे दराने केली जात आहे. वीजबिलात तब्बल पाचपट वाढ झाल्याने योजनांची पाणीपट्टीही वाढणार आहे.
शासनाने सिंचन योजनांसाठी १ मार्च २०१८ पासून वीजबिलाचा ८१-१९ फॉर्म्युला लागू केला आहे. यानुसार ८१ टक्के वीजबिल जलसंपदा विभागाने, तर १९ टक्के वीजबिल व पाणीपट्टी शेतकऱ्यांनी भरायची आहे. मात्र, वीजबिलात पाचपट वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न आणि पाणीपट्टीचा ताळमेळ बसवण्याची कसरत होणार आहे.
एक टीएमसी पाण्यासाठी १० कोटी
ताकारी व टेंभू योजनेसाठी एक टीएमसी पाणी उचलण्यासाठी १ रुपया १६ पैसे दराने ३ कोटी २६ लाख रुपये वीज बिल येत होते. आता ५ रुपये २६ पैसे दराने यासाठी १० कोटी ५० लाख रुपये वीजबिल येणार आहे.