विमानात आली चक्कर, रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडलेल्या महिलेचे इस्लामपूरच्या सुपुत्राने वाचविले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 03:33 PM2023-03-15T15:33:49+5:302023-03-15T15:34:16+5:30

हजारो फूट उंचीवर असतानाही रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ज्ञानाचा वापर करणाऱ्या इस्लामपूरच्या या सुपुत्राप्रति विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांनी उभे राहून कृतज्ञता व्यक्त केली.

The son of Islampur saved the life of a woman who fell unconscious in a state of dizziness and bleeding in the plane | विमानात आली चक्कर, रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडलेल्या महिलेचे इस्लामपूरच्या सुपुत्राने वाचविले प्राण

विमानात आली चक्कर, रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडलेल्या महिलेचे इस्लामपूरच्या सुपुत्राने वाचविले प्राण

googlenewsNext

युनूस शेख

इस्लामपूर : लंडन येथे हृदयविकारामधील अद्ययावत प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या डॉ. हर्षद प्रदीप शहा या इस्लामपूरच्या सुपुत्राने विमानात चक्कर येऊन पडल्यानंतर डोक्याला मार लागून रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडलेल्या इंडो-अमेरिकन महिलेचे विमानामध्ये उपचार करत प्राण वाचवले.

हर्षद शहा शहरातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पी. टी. शहा आणि डॉ. नीलम शहा यांचे पुत्र आहेत. त्यांनी मुंबईत वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर लंडनच्या इंटरनॅशनल क्लिनिकल फेलोशीपसाठी हृदयविकारावरील अद्ययावत प्रशिक्षण घेण्यासाठी ते रविवारी रवाना झाले. विमान प्रवासादरम्यान त्यांनी एका महिलेचे प्राण वाचविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

मुंबईतून विमानाने उड्डाण केल्यानंतर एक महिला चक्कर येऊन पडली. डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ अवस्थेत ती बेशुद्ध पडली होती. या घटनेमुळे हजारो फूट उंचीवर असलेल्या विमानात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी हवाई सुंदरींनी अत्यवस्थ महिलेला  मदत हवी आहे, त्यासाठी कोणी डॉक्टर आहेत का, अशी विचारणा केली. तेव्हा डॉ. हर्षद शहा यांनी त्वरेने जाऊन महिलेची तपासणी केली असता परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आले.

महिलेची हृदयगती आणि रक्तदाब क्षीण झाला होता. विमानातील सहप्रवासी असणाऱ्या दोन धाडसी महिला डॉक्टरांना सोबत घेत उपलब्ध साधनसामग्रीवर डॉ. हर्षद यांनी उपचार सुरू केले. यावेळी मुख्य वैमानिकांनी कॉकपीटच्या बाहेर येऊन ‘आपण सध्या तेहरानच्या हवाई हद्दीत आहोत, इथे उतरलो तर पुढचे दीड दिवस थांबावे लागेल, काय करूया,’ अशी विचारणा केली. त्यावर डॉ. हर्षद यांनी ‘केवळ १५ मिनिटे द्या, मग निर्णय घेऊ’, असे सांगून बिझनेस क्लासमधील बेडवर या महिला रुग्णावर उपचार सुरू केले.

तिने उपचाराला प्रतिसाद दिल्यानंतर तिची शारीरिक परिस्थिती सुधारली. प्रसंगावधान राखत अत्यंत धाडसाने केलेल्या उपचारामुळे या महिलेस जीवदान मिळाले. हजारो फूट उंचीवर असतानाही रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ज्ञानाचा वापर करणाऱ्या इस्लामपूरच्या या सुपुत्राप्रति विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांनी उभे राहून कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: The son of Islampur saved the life of a woman who fell unconscious in a state of dizziness and bleeding in the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.