'राष्ट्रपती निवडणुकीनंतर ठाकरे सरकार बरखास्त होईल, पंतप्रधान मोदी घेतील निर्णय'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:44 AM2022-06-13T11:44:52+5:302022-06-13T12:26:02+5:30
२०२४ मध्ये उद्धव ठाकरे यांचे मावळे कावळे होऊन उडून गेले असतील. भाजप हा सर्वात मोठा पक्ष होऊन स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करेल.
सांगली : राज्यसभेनंतर लवकरच विधान परिषद निवडणुकीत आणखी एक धक्का महाविकास आघाडीला दिला जाईल. राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाल्यानंतर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करतील, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केले.
नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीने रविवारी भावे नाट्यमंदिरात कार्यकर्ता मेळावा पार पडला. मेळाव्यास खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, माजी आमदार नितीन शिंदे, भगवानराव साळुंखे, विलासराव जगताप, नीता केळकर, शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते.
'हाळवणकर म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे न बोलता कार्यक्रम करण्यात पटाईत आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कार्यक्रम पक्का होता. केवळ मुख्यमंत्रिपदासाठीच जनादेश डावलून तीन पक्ष एकत्र आले आहेत. ठाकरेंनी दगाबाजी केली आहे. त्याचा फटका त्यांना राज्यसभा निवडणुकीत दिला आहे. येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होईल. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक झाल्यावर राज्यातील सरकार मोदी बरखास्त करतील.
ते म्हणाले, येणारा काळ भाजपचा आहे. त्याची सुरुवात राज्यसभेच्या विजयापासून झालेली आहे. २०२४ मध्ये उद्धव ठाकरे यांचे मावळे कावळे होऊन उडून गेले असतील. भाजप हा सर्वात मोठा पक्ष होऊन स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करेल.
खासदार संजयकाका पाटील म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेला चमत्कार शरद पवारांनीही मान्य केला. महाविकास आघाडीकड़े बहुमत असताना त्यांचा उमेदवार पडला हा त्यांचा नैतिक पराभव आहे. आ. गाडगीळ म्हणाले, पक्षात कोणी लहान-मोठे नाही. आपण पक्षाचे देणे लागतो अशा पद्धतीने सर्वांनी येत्या काळात काम करावे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असा ठराव नीता केळकर यांनी मांडला. त्याला विलासराव जगताप आणि संजयकाका यांनी अनुमोदन दिले.
पैशापुढे चालत नाही!
विलासराव जगताप यांनी कार्यक्रमात परखड मते मांडली. ते म्हणाले की, निवडणुका कशा होतात ते शास्त्र समजून घ्या. गाडी आहे पण त्यात इंधन नको का? पैशापुढे काही चालत नाही. नुसतं तत्त्वज्ञान सांगून काय उपयोग? त्यांच्या या मतावर अनेकांनी हसून दाद दिली.
खुर्च्या रिकाम्या... हा कसला भव्य मेळावा?
हाळवणकर यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवरून चिमटा काढला.. नाट्यगृहातील अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या. त्या पाहून हाळवणकर म्हणाले, खुर्च्या रिकाम्या आहेत. हा कसला भव्य मेळावा?