एकीकडे ‘घर चलो’ अभियान, दुसरीकडे गृहकलहाकडे नाही ध्यान; भाजपमधील गटबाजीकडे प्रदेशाध्यक्षांचा कानाडोळा
By अविनाश कोळी | Published: October 12, 2023 01:34 PM2023-10-12T13:34:57+5:302023-10-12T13:36:17+5:30
गटबाजीचा हा प्रश्न निवडणुकीपूर्वी पक्षाची चिंता वाढविणारा ठरू शकतो
अविनाश कोळी
सांगली : लोकसभा, विधानसभा निवडणुकांची तयारी म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘घर चलो’ अभियानानिमित्ताने सांगली दौरा केला. मात्र, या दौ-यात गृहकलहाकडे दुर्लक्ष केले. विविध मतदारसंंघांतील पदाधिकारी व नेत्यांनी पक्षातील गटबाजीचे प्रकार त्यांच्या कानावर घातले. पण त्याकडे कानाडोळा करीत त्यांनी पक्षीय अभियानाची औपचारिकता पार पाडण्यात धन्यता मानल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
भाजपकडून जिल्ह्यात लोकसभेची तयारी म्हणून निवडणूक प्रमुखांची निवड केली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुखांना पक्षीय संघटन मजबूत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेचच प्रदेशाध्यक्षांनी जिल्ह्याचा दौरा आखून ‘घर चलो’ अभियान राबविले. नागरिकांशी संवाद साधत असतानाच पक्षातील बिघडलेला संवाद त्यांच्यापर्यंत पोहोचला. गटबाजीचा बेसूर आवाज दौऱ्यावेळी त्यांच्या कानावर पडला, पण त्यांनी कानावर हात ठेवत अभियानावर लक्ष केंद्रित केले.
त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर गटबाजीचा पूर्वीचा सौम्य स्वर आता तार सप्तकात पोहोचला आहे. हे गाणे सुरात नसल्याने त्याची दखल घेणे प्रदेशाध्यक्षांनी आवश्यक होते, असे मत निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. गटबाजीचा हा प्रश्न निवडणुकीपूर्वी पक्षाची चिंता वाढविणारा ठरू शकतो.
मिरजेतील गटबाजीचा ऊहापोह
मिरजेच्या शासकीय विश्रामगृहातील सुकाणू समितीच्या बैठकीत पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या कारभाराबाबत तक्रारी केल्या. पालकमंत्र्यांनीही त्यांना अडथळा ठरणाऱ्या काही पदाधिकारी, नेत्यांची तक्रार खासगीत त्यांच्याकडे केली. ‘पाहतो’, अशा एका शब्दात बावनकुळेंनी या विषयावर पडदा टाकला.
जतमधून बंडाचा झेंडा
जत तालुक्यातील गटबाजी गेल्या कित्येक महिन्यांपासून उफाळली आहे. भाजपच्या नव्या कार्यकारिणीतील निवडीला माजी आमदार विलासराव जगताप यांनी आक्षेप घेतला. त्यावरून धुसफूस सुरु असतानाच आता लोकसभेचा उमेदवार बदलला नाही तर पक्षाचे काम न करण्याचा इशाराच जगताप यांनी दिल्याने पक्षात कल्लोळ सुरू आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याकडेही पाठ फिरवली.
संजय पाटील-पृथ्वीराज देशमुख यांच्यात मतभेद उघड
खासदार संजय पाटील व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यातील राजकीय संघर्ष जुना आहे. तरी आता यात नवा अध्याय लिहिला जात आहे. तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यावर खासदारांनी टीका केली. त्यानंतर देशमुखांनी लगेचच सुमनताईंना पाठिंबा दिला. लोकसभेच्या उमेदवारीवर देशमुखांनी दावेदारी केल्याने हे दोन्ही नेते आमने-सामने आलेत. तसेच, त्यांच्यातील मतभेदाविषयी उघडपणे बोलले जात आहे.
महायुतीचा संघर्षही टोकाला
महायुतीत शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये खानापूर मतदारसंघात संघर्ष उफाळला आहे. विधानसभेच्या या जागेवर विद्यमान आमदार अनिल बाबर यांच्याविरोधात भाजपच्या पडळकरांनी शड्डू ठोकला आहे. भाजपमधील नेते दोन्ही नेत्यांच्या समर्थनार्थ विभागले गेले आहेत.