कृषी लिपिकांचे आजपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु, सांगलीतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केलं काम
By संतोष भिसे | Published: November 28, 2022 05:40 PM2022-11-28T17:40:26+5:302022-11-28T17:40:53+5:30
जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, रिक्त पदे त्वरित भरावीत यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन
सांगली : कृषी खात्यातील लिपिक वर्ग कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि. २८) राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरु केले. कृषी वर्ग लिपिक संवर्ग संघटनेने आंदोलन जाहीर केले आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज, सोमवारपासून काळ्या फिती लावून काम सुरु केले.
संघटनेच्या मागण्या अशा : जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, रिक्त पदे त्वरित भरावीत, सहाव्या आणि सातव्या आयोगाच्या प्रलंबित प्रकरणांची निर्गती करावी, ४० टक्के कर्मचारी कपातीचा आकृतीबंध लागू करु नये, वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक ही पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत. अनुरेखक पदे रद्द न करता लिपिक वर्गाला वाटप करावीत, पुणे मुख्यालयात विश्रामगृहाची व्यवस्था करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर संधी द्यावी.
संघटनेने सांगितले की, २०१९ पासून सरकारी भरती झालेली नाही, त्यामुळे कृषी खात्यातील २७ हजार ५०२ पदांपैकी ९ हजार ८३२ रिक्त आहेत. यात लिपिक वर्गाची पदे सर्वाधिक आहेत. मागण्यांच्या पुर्ततेसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सोमवारपासून काळ्या फिती लावून काम सुरु केले. १ डिसेंबरला लेखणी बंद आंदोलन केले जाणार आहे. ५ डिसेंबर रोजी राज्यभरात धरणे आंदोलन होईल.