सांगलीच्या आदर्श ‘मॉडेल स्कूल’चे धडे आता संभाजीनगरचे विद्यार्थी गिरवणार

By अशोक डोंबाळे | Published: October 13, 2022 11:41 AM2022-10-13T11:41:15+5:302022-10-13T11:41:42+5:30

पंचतारांकित हॉटेलप्रमाणे शाळांच्या इमारती झाल्या असून, सुसज्ज अशी मैदाने केली तयार

The students of Sambhajinagar will now learn the lessons of Adarsh Model School of Sangli | सांगलीच्या आदर्श ‘मॉडेल स्कूल’चे धडे आता संभाजीनगरचे विद्यार्थी गिरवणार

सांगलीच्या आदर्श ‘मॉडेल स्कूल’चे धडे आता संभाजीनगरचे विद्यार्थी गिरवणार

Next

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्याशाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित केल्या आहेत. या आदर्श उपक्रमाची अंमलबजावणी औरंगाबाद (संभाजीनगर) महापालिका शाळेत राबविण्याचा निर्णय तेथील महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी घेतला आहे. सांगलीच्या आदर्श ‘मॉडेल स्कूल’चे धडे आता संभाजीनगरचे विद्यार्थी गिरवणार आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी यांनी रुजू झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा संकल्प केला होता. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शाळांमधील मूलभूत सुविधाही विकसित करण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नास तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील आणि डॉ. अभिजित चौधरी यांनीही पाठबळ दिले होते. एवढेच नव्हे, तर जिल्हा नियोजनमधून शिक्षणाच्या मूलभूत सुविधांवर १२० कोटींहून अधिकचा निधी खर्च झाला.

पंचतारांकित हॉटेलप्रमाणे शाळांच्या इमारती झाल्या असून, सुसज्ज अशी मैदाने तयार केली आहेत. या मूलभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासह विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या गळती थांबली असून, दहा हजार विद्यार्थ्यांची पटसंख्येत भर पडली आहे.

या आदर्श उपक्रमाचे डॉ. अभिजित चौधरी हे साक्षीदार असल्यामुळे त्यांनी लगेच सांगली जिल्हा परिषदेचे ‘मॉडेल स्कूल’ हे अभियान संभाजीनगर महापालिका शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच त्यांनी सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, शिक्षक अमोल हंकारे, अमोल सातपुते व बाबासाहेब परीट यांना महापालिका शिक्षण मंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी बोलाविले होते. मोहन गायकवाड यांनी सांगली जिल्हा परिषदेने राबवलेल्या माझी शाळा, आदर्श शाळा अर्थात ‘मॉडेल स्कूल’च्या उपक्रमाचे सादरीकरण प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी केले.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणार

डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, महानगरपालिकेतील शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद, सांगली आणि महापालिका दोघांमध्ये एक शिक्षणाचा सेतू निर्माण करणार आहे. सांगलीतील चांगल्या बाबी व संभाजीनगरमधील चांगल्या बाबी यांचा विचार करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

शिक्षकांकडून उत्कृष्ट सादरीकरण

शिक्षक अमोल हंकारे, बाबासाहेब परीट, अमोल सातपुते यांनी मॉडेल स्कूलचे उत्कृष्ट सादरीकरण केले. परीट यांनी आपल्या कथाकथन शैलीत अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन करून लोकांना खिळवून ठेवले होते. हंकारे यांनी ‘डीजी स्कूल ॲप’संदर्भात मार्गदर्शन करून हे ॲप शिक्षकांसाठी, विद्यार्थी व पालकांसाठी कसे महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले.

Web Title: The students of Sambhajinagar will now learn the lessons of Adarsh Model School of Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.