सर्वेक्षणामध्ये सांगली जिल्ह्यात आढळली ६११ शाळाबाह्य मुले, वीटभट्ट्यांवरील बालकांची शाळा बंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 05:23 PM2022-12-14T17:23:25+5:302022-12-14T17:23:54+5:30

ऊसतोडणी मजुरांचे आई-वडील मुलांना शाळेत पाठवत नसल्याची बाब समोर आली

The survey found 611 out of school children in Sangli district | सर्वेक्षणामध्ये सांगली जिल्ह्यात आढळली ६११ शाळाबाह्य मुले, वीटभट्ट्यांवरील बालकांची शाळा बंदच

संग्रहीत फोटो

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील शाळाबाह्य आणि स्थलांतरित मुलांचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विशेष सर्वेक्षण मोहीम राबविली होती. यामध्ये जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ६११ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. या मुलांना जिल्हा परिषदेच्या जवळच्या शाळेत दाखल करून त्यांना शिक्षण प्रवाहात आणले आहे. शाळाबाह्य मुलांपैकी बहुतांशी मुलेही ऊसतोड मजुरांचीच आहेत.

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दि. २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत केलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात शहरात ६११ मुले आढळून आली. सर्वेक्षण पथकांनी ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्यांवर जाऊन कुटुंबांचे सर्वेक्षण केले. शाळाबाह्य आढळलेल्या ६११ मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल केले आहे.

ऊसतोडणी मजुरांचे आई-वडील मुलांना शाळेत पाठवत नसल्याची बाब समोर आली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियमातील तरतुदी अंतर्गत स्थलांतरित मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्याची तरतूद आहे. त्यानुसार संबंधित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे, याकरिता सर्वेक्षण हाती घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाने परिपत्रकाद्वारे दिले होते. त्यानुसार जिल्हाभरात सर्वेक्षण करण्यात आले होते.

वीटभट्ट्यांवरील बालकांची शाळा अजूनही बंदच

शहर व परिसरातील वीटभट्ट्या, दगडखाणी, शेतमजूर, औद्योगिक वसाहती तसेच इतरही स्थलांतरित मजूर व कामगार येणाऱ्या ठिकाणी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली नाही. येथील मुलांचा शोध घेतल्यास आणखी मोठी संख्या पुढे येण्याची शक्यता आहे; पण या मुलांचा शोध अद्याप प्रशासनाकडून घेतला नसल्यामुळे ते आई-बाबांबरोबर मजुरीच करत आहेत. या बालकांना शाळेचा दरवाजा कधी उघडणार असा सवाल सामाजिक संघटनांकडून होत आहे.

Web Title: The survey found 611 out of school children in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.