बेड्यांसह पळालेला संशयित २४ तासांत जेरबंद, सांगली कारागृहासमोर घडले थरारनाट्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 12:07 PM2024-01-08T12:07:24+5:302024-01-08T12:08:44+5:30
पाेलिसांचे क्षणभर दुर्लक्ष झाले अन्..
सांगली : खुनातील संशयित लक्ष्मण अण्णा चौगुले (वय ३०, रा. वडर वस्ती, विटा) याने वैद्यकीय तपासणीनंतर जिल्हा कारागृहात जाण्यापूर्वी पोलिसांना हिसडा मारून बेड्यासह पलायन केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला होता. चौगुले याच्या पलायनानंतर खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणसह शहर पोलिसांच्या पथकाने तत्काळ शोधमोहीम राबवली. रविवारी सायंकाळी त्याला कृष्णाघाटावरील जनावरांच्या बाजार परिसरात पकडले.
२०१८ मध्ये झालेल्या एका खुनात लक्ष्मण चौगुले हा संशयित आहे. जिल्हा कारागृहात तो न्यायालयीन कोठडीत होता. काही दिवसांपासून त्याला लघवीचा त्रास सुरू होता, तसेच पायदेखील लुळे पडत होते. त्यामुळे सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. नंतर कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये उपचारासाठी पाठवले होते. तेथून त्याला ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्याची शिफारस केली होती. लक्ष्मण याला शनिवारी सकाळी पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी ससूनला नेले होते. तेथे उपचार केल्यानंतर रात्री ११:३० वाजेच्या सुमारास त्याला सांगलीत आणले.
जिल्हा कारागृहात आतमध्ये सोडण्यापूर्वी सहायक फौजदार पाटील यांना छातीत दुखत असल्यामुळे त्रास होऊ लागला. ते गाडीतून उतरून खाली बसताच दोघे सहकारी मदतीसाठी धावले. याच क्षणाचा फायदा घेत लक्ष्मण याने बेड्यासह धूम ठोकली. त्यामुळे पोलिसांची पळापळ झाली. कारागृहातील पोलिस दरवाजा उघडून बाहेर येण्यापूर्वी लक्ष्मण अंधारात पसार झाला होता. पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली; परंतु तो हाती लागला नाही. रविवारी त्याचा सर्वत्र शोध सुरू होता. सायंकाळी जनावरांच्या बाजार परिसरात त्याला संशयास्पदरीत्या फिरताना पकडले. त्यानंतर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
पाेलिसांचे क्षणभर दुर्लक्ष झाले अन्..
संशयित लक्ष्मणला पुणे येथून सांगलीत आणताना वाटेत सहायक फौजदार पाटील यांना इस्लामपूर येथे त्रास होऊ लागला. त्यांनी गाडी न थांबवता थेट सांगलीत येण्याचा निर्णय घेतला. रात्री ११:३० वाजता कारागृहासमोर गाडीतून उतरून ते थोडावेळ खाली बसले. चालक व पोलिस कर्मचारी त्यांच्याकडे धावले. तेवढ्यात लक्ष्मण बेड्यासह पळाला होता.