Sangli: म्हैसाळ भ्रूण हत्याप्रकरणी यंत्रणेची चौकशी करावी, राज्यपालांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 02:51 PM2024-09-26T14:51:14+5:302024-09-26T14:51:52+5:30
जिल्ह्यातील प्रश्नांची यादी उद्धवसेनेकडून सादर
सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील ३९ स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. मात्र, या प्रकरणात पोलिस व आरोग्य यंत्रणेने उदासीनता दाखविली. हा तपास थांबविला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली.
राज्यपालांना दिलेल्या पत्रात उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर यांनी म्हटले आहे की, सात वर्षांपूर्वी म्हैसाळ येथे एका डॉक्टरने ३९ गर्भपात केल्याचे उघडकीस आले होते. अनेक स्त्रीभ्रूण हत्या त्यांनी केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी थांबवला. या प्रकरणामध्ये महिला विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची प्रक्रिया गृहमंत्रालयात प्रलंबित आहे. त्यामुळे या खटल्यातसुद्धा संबंधित डॉक्टरला शिक्षा होऊ शकली नाही.
सांगली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये शासनाकडून आलेल्या विकास निधीचा खर्च अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाल्याने शासनाचे अब्जावधी रुपये वाया गेले आहेत. हा निधी विकासकामाच्या नावाखाली खर्च न होता अवैध मार्गाने एका रॅकेटच्या खिशात गेला आहे. याची चौकशी करावी.
सांगलीतील दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्मारक गेली तीस वर्षे रखडले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, पांडू मास्तर, नागनाथ अण्णा नायकवडी, हिंदकेसरी मारुती माने, आधुनिक महाकवी ग. दि. माडगूळकर, दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील अशा अनेकांची स्मारके रखडली आहेत.
समान पाणीवाटपाचे धोरण हवे
सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू आणि वाकुर्डे या योजना जवळपास पूर्ण झाल्या आहेत. मात्र, सर्वांना समान पद्धतीने पाणी वाटप होण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाऊन नंतर ते सर्वांत पहिल्या गावापर्यंत यावे. यासाठी नियोजनाची गरज आहे, अशी मागणीही राज्यपालांकडे करण्यात आली.
राज्यपालांकडून प्रश्नांची नोंद
राज्यपालांनी निवेदन स्वीकारत या प्रश्नांची नोंद घेऊन ते सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही होईल, असे आश्वासन दिले. उद्धवसेनेच्या वतीने राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.