दिल्लीतील सत्ताधीशाकडून देश तोडण्याचे काम, योगेंद्र यादवांची भाजप सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 01:30 PM2022-11-03T13:30:43+5:302022-11-03T13:31:49+5:30

कोरोनामुळे देशातील ९७ टक्के कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या उलट देशातील एका उद्योगपतीची संपत्ती मात्र वाढत गेली.

The task of breaking the country by the rulers of Delhi, Yogendra Yadav criticism of the BJP government | दिल्लीतील सत्ताधीशाकडून देश तोडण्याचे काम, योगेंद्र यादवांची भाजप सरकारवर टीका

दिल्लीतील सत्ताधीशाकडून देश तोडण्याचे काम, योगेंद्र यादवांची भाजप सरकारवर टीका

Next

सांगली : दिल्लीत खुर्चीत बसलेले लोक देश तोडण्याचे काम करीत आहेत. देशात बलात्कार, खून करण्याचा सन्मान होत आहे. महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त असताना राज्यकर्ते धर्माधर्मांत भांडणे लावण्याचा उद्योग करीत असल्याची टीका स्वराज इंडियाचे संस्थापक शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी सांगलीत केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशात बदल घडत आहे. या यात्रेला समर्थन द्या, असे आवाहनही त्यांनी केले. सांगलीतील स्टेशन चौकात नफरत छोडो, भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ जनसंवाद यात्रा झाली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादीचे प्रा. पद्माकर जगदाळे, शिवसेनेचे शंभुराज काटकर, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, नगरसेवक मंगेश चव्हाण, मयूर पाटील, तौफिक शिकलगार, फिरोज पठाण उपस्थित होते. प्रारंभी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर समन्वयक ललित बाबर यांनी भारत जोडो यात्रेची माहिती दिली.

यादव म्हणाले की, गेल्या चार ते पाच वर्षांत देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. पण त्याची प्रसारमाध्यमात चर्चा होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातही हे मुद्दे नसतात. दिल्लीतील राज्यकर्ते या मुद्दयांपासून जनतेला भटकविण्यासाठी हिंदू-मुस्लीम करीत असतात. भारत मातेच्या दोन्ही सुपुत्रात भांडणे लावण्याचा उद्योग भाजप करीत आहेत. देशात बलात्कार, खून करणाऱ्यांचा सन्मान होत आहे. संविधान, लोकशाहीची मूल्ये नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या साऱ्याविरोधात राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या यात्रेचा परिणाम दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आता देशात महागाई, बेरोजगारी दिसू लागली आहे. देशातील सध्याची परिस्थती बदलण्यासाठी जात, धर्म, पक्ष विसरून रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मराठा सेवा संघाचे प्रा. संजय पाटील, ॲड. अजित सूर्यवंशी, ॲड. के. डी. शिंदे, नितीन चव्हाण, करीम मेस्त्री यांच्यासह स्वराज इंडियाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

उद्योगपती मित्राची भरभराट

कोरोनामुळे देशातील ९७ टक्के कुटुंबाची आर्थिक स्थिती कोलमडली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. या उलट देशातील एका उद्योगपतीची संपत्ती मात्र वाढत गेली. लाॅकडाऊन सुरू झाला तेव्हा त्यांची संपत्ती ६६ हजार कोटी होती. आज ती १२ लाख कोटी इतकी आहे. दोन वर्षांत १८ टक्के वाढ झाली. हे उद्योगपती कोणाचे मित्र आहेत, हे देशाला माहीत असल्याचे सांगत यादव यांनी पंतप्रधानांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

Web Title: The task of breaking the country by the rulers of Delhi, Yogendra Yadav criticism of the BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.