सांगलीतील कोंगनोळीत शिक्षिकेवर चाकूने वार करून सोने लुटले, चौघा अज्ञातांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 11:47 AM2023-10-11T11:47:01+5:302023-10-11T11:47:30+5:30
प्रतिकार केला असता एकाने त्यांची गाडी व एक हात धरून ठेवला तर दुसऱ्याने चाकूने वार केला
कवठेमहांकाळ : कोगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील ढवळे वस्तीवरील महिला शिक्षिकेस हातावर चाकूने वार करून लुटण्यात आले. रक्तबंबाळ झालेल्या शिक्षिकेचे गळ्यातील, कानातील सुमारे एक लाख पंधरा हजाराचे सोने हल्लेखाेरांनी पळवले. ही घटना मंगळवार दि. १० राेजी सकाळी दहा वाजता घडली.
याप्रकरणी दीपाली अरुण मगर (रा. कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ) यांनी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चाैघा अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी दीपाली मगर या काेंगनाेळीतील ढवळेवस्तीवर राहतात. त्या अग्रण धुळगाव येथील हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. मंगळवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे दुचाकीवरून (क्र. एमएच १० सीएच ९६६१) शाळेकडे जात होत्या. याचवेळी दोन मोटारसायकलीवरून आलेल्या चाैघा अज्ञातांनी दीपाली मगर याच्या दुचाकीच्या आडवे येत त्यांना राेखले.
चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडे दागिन्यांची मागणी केली. त्यांनी अज्ञात प्रतिकार केला असता एकाने त्यांची गाडी व एक हात धरून ठेवला तर दुसऱ्याने चाकूने हातावर वार केला. तसेच गळ्यातील सोने व कानातील सोने हिसका देत लंपास केले.
यामध्ये दीपाली यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हल्लेखाेरांनी मगर यांच्या हातातील अंगठ्या, सोन्याचे मंगळसूत्र, बेंटेक्सच्या दोन बांगड्या, कानातील गुंड असा सुमारे एक लाख पंधरा हजार रुपयांचे दागिने लंपास लंपास केले. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसात अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाययक पोलिस निरीक्षक सागर गोडे करीत आहेत.