कृष्णा नदीवरील तिन्ही पुलांना जलसंपदाची परवानगीच नाही, बांधकाम विभागाकडून परस्परच काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 05:54 PM2022-03-10T17:54:49+5:302022-03-10T17:55:11+5:30
सांगली : जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील हरिपूर, सांगली आयर्विन पूल, डिग्रज या तिन्ही पूल बांधकामास सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानाच घेतला ...
सांगली : जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील हरिपूर, सांगली आयर्विन पूल, डिग्रज या तिन्ही पूल बांधकामास सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानाच घेतला नाही, असे स्पष्टीकरण जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापूर नियंत्रण समितीच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीचे सेवानिवृत्त अधिकारी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, सामाजिक कार्यकर्ते हनुमंतराव पवार, समिती निमंत्रक सर्जेराव पाटील, संजय कोरे, धनाजी चडमुंगे, दीपक पाटील, सुनील गरडे, प्रशांत शहा यांनी सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांची भेट घेतली.
यावेळी समितीच्या सदस्यांनी कृष्णा नदीवरील हरिपूर, सांगली आयर्विन पुलाजवळ आणि मौजे डिग्रज येथे पूल बांधण्याचे काम चालू आहे. या पुलांचा भराव आणि त्यांची बांधण्याची पध्दत महापुरास कारणीभूत ठरणार आहे. यामुळे नदीजवळ भराव टाकू नये, याबाबत संबंधित विभागाला सूचना द्यावी, अशी मागणी केली.
यावर अधीक्षक अभियंता नाईक यांनी कृष्णा नदीवरील पूल बांधकामासाठी आमच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानाच घेतला नाही. तसेच संबंधित पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत असल्यामुळे त्यांच्याशीच चर्चा करण्याची सूचना केली. नाईक यांच्या या उत्तरानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियमबाह्यच कृष्णा नदीवरील पुलांची बांधकामे होत असल्याचे उघडकीस आले.
या प्रकाराबद्दल महापूर नियंत्रण समितीच्या अधिकाऱ्यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. हणमंतराव पवार यांनी सार्वजनिक बांधकाम, जलसंपदासह सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना एकत्रित करून जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेण्याबाबत प्रयत्न करूया, असे सांगितले.
नागपूर-रत्नागिरी रस्त्यामुळे पुराचा धोका वाढला
नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी धामणी, ता. मिरज येथे मोठ्या प्रमाणात भराव घातला आहे. या ठिकाणी जर पूल बांधला असता तर पुराचे पाणी खालून गेले असते; पण भराव घातल्यामुळे मिरज तालुक्यातील धामणी, अंकलीसह सांगली शहरातील शामरावनगर, विश्रामबागेला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, याकडे कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.