श्वासनलिका तुटली, आवाजही गेला, पण सिव्हिलच्या डॉक्टरांनी पुनर्जन्म दिला

By संतोष भिसे | Published: February 26, 2023 06:28 PM2023-02-26T18:28:17+5:302023-02-26T18:41:45+5:30

डॉक्टरांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरलेली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला.

The trachea was broken, the voice was lost, but the civil doctor rebirth ujwala khot in sangli | श्वासनलिका तुटली, आवाजही गेला, पण सिव्हिलच्या डॉक्टरांनी पुनर्जन्म दिला

श्वासनलिका तुटली, आवाजही गेला, पण सिव्हिलच्या डॉक्टरांनी पुनर्जन्म दिला

googlenewsNext

सांगली : जवळच्याच व्यक्तीने धारदार हत्याराने केलेल्या हल्ल्यात उज्वला खोत यांची श्वासनलिकाच तुटली. स्वरयंत्राला इजा झाली. नातेवाईकांनी तिच्या जगण्याची आशाच सोडून दिली होती. पण सिव्हिलमधील डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. उज्वलाचा जीव तर वाचवलाच, शिवाय आवाजही पूर्वीसारखाच खणखणीत मिळवून दिला. डॉक्टरांसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरलेली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला.

सांगलीत रेल्वे स्थानकाजवळ उज्वला बाळासाहेब खोत दोन मुले व आईसोबत राहतात. ६ जानेवारी रोजी एका दुर्घटनेत धारदार हत्याराचे थेट गळ्यावर वार झाले. आईने अत्यवस्थ अवस्थेत शासकीय रुग्णालयात आणले. घाव थेट श्वासनलिकेपर्यंत पोहोचला होता. नलिकेची दोन हाडे तुटली होती. स्वरयंत्रालाही इजा झाली होती. शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद इंगळे, युनिट प्रभारी डॉ. सुबोध उगाणे यांनी वैद्यकीय ज्ञान पणाला लावले. सुमारे तीन तास शस्त्रक्रिया चालली. श्वासनलिका काळजीपूर्वक जोडली. जीव बचावला.

याकामी डॉ. प्रतीक छोटालिया, परीन व्होरा, अतुल पाटील, डॉ. उज्वला खैरमोडे, रवीराज पोळ, मानसी सावरकर, अस्मिता देसाई यांनीही सहकार्य केले. जीव वाचला, पण आवाजाची शाश्वती नव्हती. कान, नाक घसा विभागाच्या तज्ज्ञांनी प्रयत्न सुरुच ठेवले. घशातून सुरुवातीला मोठी व नंतर लहान अशा तीन नलिका घातल्या. अन्न, औषधांनी उज्वलाला त्राण आणले. नैसर्गिक स्वरयंत्र पुन्हा जैसे थे करणे म्हणजे आधुनिक वैद्यक विश्वासाठीही अत्यंत आव्हानात्मक कामगिरी. पण सराव व उपचार थांबले नाहीत.

उज्वलाची जिद्द

आपला आवाज जाण्याची शक्यता लक्षात येताच उज्वला यांनीही जिद्द केली. तोंडाने आणि नाकाने श्वासोच्छवासाचा सराव सुरु ठेवला. धातूच्या नलिकेत हवेतील कचरा जाण्याने रात्री-बेरात्री श्वास गुदमरायचा. तातडीने सिव्हीलमध्ये धाव घ्यायच्या. एक-दोनदा तर एका रात्रीत चारवेळा सिव्हीलमध्ये धाव घ्यावी लागली. कर्मचाऱ्यांनीही आव्हानात्मक केस असल्याने कंटाळा केला नाही. सुमारे सव्वा महिना उज्वला यांनी स्वत:चा आवाज ऐकला नव्हता. पण प्रयत्नांना यश आले. आवाज पूर्ववत झाला. सध्या त्या खणखणीत बोलतात.

नातेवाईकांनी माझ्या जगण्याची आशाच सोडली होती. शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अथक प्रयत्न करुन जीव वाचवला. पण नंतर आवाज जाण्याची भिती निर्माण झाली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी अथकपणे सराव करुन घेतल्याने पुन्हा बोलू शकले. मला जणू पुनर्जन्म मिळाला. - उज्वला खोत, रुग्ण

Web Title: The trachea was broken, the voice was lost, but the civil doctor rebirth ujwala khot in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.