विरोध डावलून जुना बुधगाव रस्त्यावरील वाहतूक वळवली, वाहतूक कोंडीचा धोका वाढला
By अविनाश कोळी | Published: July 13, 2024 09:08 PM2024-07-13T21:08:13+5:302024-07-13T21:08:26+5:30
सांगली : सामाजिक संघटना, नागरिकांचा विरोध असतानाही जुना बुधगाव रस्त्यावरील पंचशीलनगर रेल्वे उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. ...
सांगली : सामाजिक संघटना, नागरिकांचा विरोध असतानाही जुना बुधगाव रस्त्यावरील पंचशीलनगर रेल्वे उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी येथील वाहतूक वळविण्यासाठी लोखंडी बॅरिकेटस् लावण्यात आले. निम्म्या रस्त्यावरून आता वाहतुकीची कसरत नागरिकांना करावी लागणार आहे.
केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम्’ या योजनेंतर्गत जुना बुधगाव रोडवरील पंचशीलनगर येथील रेल्वे फाटक क्रॉसिंग नंबर १२९वर नवा उड्डाणपूल होत आहे. हा रस्ता चिंतामणीनगर उड्डाणपुलाला पर्यायी रस्ता म्हणून वापरला जात होता. त्यावरही आता कोंडी होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या पुलाच्या कामास परवानगी दिली. सामाजिक न्याय भवनापासून रेल्वे गेट, तसेच पंचशीलनगरपर्यंत रस्त्याच्या अर्ध्या भागात काम व अर्धा रस्ता वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. दुचाकी व तीनचाकींसाठीच हा रस्ता खुला राहणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर सांगलीतील सामाजिक संघटना, रिक्षा संघटना, तसेच नागरिकांनी या कामास विरोध दर्शविला. चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपूल उभारल्याशिवाय नवा रेल्वे पूल उभारला जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. हे काम बंद पाडण्याचा इशाराही देण्यात आला होता. तरीही शनिवारी सकाळपासून पुलाच्या उभारणीची तयारी याठिकाणी सुरू करण्यात आली. रस्त्याचा ६० टक्के भाग पुलाच्या कामासाठी ताब्यात घेण्यात आला आहे. उर्वरित रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. बॅरिकेटस् उभारणी पूर्ण झाली आहे.
चिंतामणीनगर पूल कधी होणार ?
चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. १५ ऑगस्टपर्यंत त्यास मुदत दिली होती. ते कधी पूर्ण होईल, याची खात्रीशीर माहिती कोणालाही नाही. अशा स्थितीत आता पर्यायी जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात होणार आहे.
या संघटनांनी केला विरोध
सांगली जिल्हा रिक्षा चालक, मालक संघटना कृती समिती, करवीर रिक्षा संघटना, हिंदू एकता आंदोलन, भाजप, राष्ट्रवादीने या पुलाच्या कामास विरोध दर्शविला आहे. प्रसंगी हे काम बंद पाडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पाऊस वाढल्यास हाल
पावसाचा जोर सध्या कमी आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर सांगलीतील वाहतूक कसरतीची होणार आहे. चारचाकी वाहनांसाठी कर्नाळ रस्त्यावरील पर्यायी वाहतूक अडचणीची होईल. हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. याशिवाय ३५ फुटांवर कृष्णा नदीचे पाणी गेल्यानंतर सांगलीचा कर्नाळ रस्ता बंद होतो. जुना बुधगाव रस्त्यावर रेल्वे गेट ओलांडल्यानंतर अत्यंत अरुंद रस्ता असल्याने या ठिकाणीही वाहतूक कोंडी होणार आहे.