हृदयद्रावक! वाहनाने ठोकरले...जीव गेल्यावरही असंख्य गाड्यांनी मृतदेहाला चिरडले; मिरजेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 01:34 PM2022-12-13T13:34:56+5:302022-12-13T13:35:28+5:30
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावरून शेकडो वाहने गेली. मृतदेह रस्त्यावरून बाजूला करण्याचे सौजन्य कोणीही दाखविले नाही. या प्रकाराने माणुसकी जिवंत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिरज : निलजी-बामणी (ता. मिरज) येथे रस्त्याच्या कडेने चालत निघालेल्या अनोळखी पादचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जीव गेला. अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून पसार झाले; मात्र त्यानंतर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावरून शेकडो वाहने गेली. अक्षरश: चिंधड्या झाल्या. मृतदेह रस्त्यावरून बाजूला करण्याचे सौजन्य कोणीही दाखविले नाही. रविवारी सकाळी घडलेल्या या प्रकाराने माणुसकी जिवंत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गावर निलजी-बामणी हद्दीत हा अपघात घडला. मृत ३५ वर्षांचा तरुण बेघर असून, निलजी परिसरात कोठेही फिरत असल्याचे सांगण्यात आले. रविवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास तो रस्त्याच्या कडेने चालत निघाला होता. यादरम्यान अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. भरधाव वाहनचालकास अपघात झाल्याचे कळले की नाही, हाही प्रश्नच;
मात्र अपघातानंतर भररस्त्यात पडलेल्या मृतदेहावरून नंतरच्या तासाभरात शेकडो वाहने गेली. कोणीही मृतदेह रस्त्यावरून बाजूला करण्याचे अथवा मृतदेहावरून जाणाऱ्या वाहनांना अटकाव करण्याचे सौजन्य दाखविले नाही. शेकडो वाहने अंगावरून गेल्याने मृतदेहाच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या.
याबाबतची माहिती मिळताच पोलिसपाटील रफिक अहमद महमद इसाक पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसांना अपघाताविषयी कळविले. पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी धावले. मृतदेहाचे तुकडे अक्षरश: पोत्यात भरून नेण्याची वेळ पोलिसांवर आली. मनाला चटका लावणाऱ्या या घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत होती. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.