Sangli: वारणा नदीत पुरात वाहून गेला; रात्र झाडावर बसून काढली, तेरा तासानंतर सुखरुप सुटका झाली, अन् म्हणाला..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 01:07 PM2023-07-28T13:07:53+5:302023-07-28T13:23:49+5:30
आत्महत्येचा प्रयत्न फसल्याची चर्चा
प्रदीप मोरे
मांगले (सांगली): मांगले- काखे पुलाजवळ वारणा नदीला आलेल्या महापुरात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास बजरंग पांडुरंग खामकर (वय-५८, रा. लादेवाडी) हा नदीच्या पाण्यात पडला. रात्रीच्या अंधारात नदीच्या पात्रात मध्यभागी एका झाडाचा आधार घेवून रात्र झाडावरच बसुन काढली. सकाळी सात वाजता शेतातील माणसे दिसल्यावर तो आरडा -ओरडा करु लागल्यानंतर हा प्रकार समजला.
त्यानंतर सांगली आणि कोल्हापूर प्रशासनाला माहिती दिल्यानंतर तात्काळ हालचाली सुरु झाल्या आणि आज सकाळी साडे दहाच्या सुमारास तब्बल तेरा तासानंतर कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने बोटीद्व्वारे त्याची सुटका केली. यावेळी मांगले, देववाडी, काखे परिसरातील लोकांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
सांगली-कोल्हापूर जिल्हे जोडणा-या वारणा नदीवरील मांगले-काखे नवीन पुलाजवळ काल, गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास बजरंग खामकर हा इसम मोटरसायकलवरुन मांगले-काखे पुलावर गेला. मोटरसायकल मध्यभागी लावली होती. त्याच्या म्हणन्यानुसार रात्री तो पाय घसरुन पडला आणि थेट वारणा नदीला आलेल्या महापुरात पडला. सुमारे सातशे फुट नदीच्या प्रवाहातून पुढे पोहत गेला. त्यानंतर त्याला मध्यभागी झाड सापडले त्या झाडाचा आधार घेत झाडावर चढुन बसला. रात्री देववाडी रस्त्यावर जाणा-या प्रवाशांना हाक देत होता. नदीचा प्रवाह व वरुन पाऊस यामुळे त्याचा आवाज कोणापर्यंत पोहचला नाही.
सकाळी मांगले व देववाडी नदीकाठावरील शेतकरी शेतात गेल्यानंतर...वाचवा...वाचवा...अशा आरोळ्या ऐकु आल्या त्यावेळी नदीच्या मध्यभागी पुरात एक इसम अडक़ल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस पाटील यांनी शिराळा तहसिलदार यांना कळविले त्यानंतर तातडीच्या हालचाली सुरु झाल्या. कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनची एन.डी.आर.एफ ची टीम सकाळी सव्वा दहा वाजत दाखल झाली. तब्बल तेरा तास पुरात अडकलेल्या या युवकांला पथकाने बोटीद्वारे सुखरुप बाहेर काढले.
बजरंग घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याला मांगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी शिराळा तहसिलदार शामला खोत-पाटील, पन्हाळा तहसिलदार माधवी शिंदे-जाधव, शिराळा पोलीस निरीक्षक शिध्देश्वर जंगम, कोडोली पोलीस ठाण्याचे सपोनी शितलकुमार डोईजड यांनी खामक्रर यांच्या सुटकेनंतर निश्वास: टाकला.
आत्महत्येचा प्रयत्न फसल्याची चर्चा
दरम्यान मी पाणी आणण्यासाठी नदीत उतरल्याने पाय घसरुन पडल्याचे बजरंगने पोलिसांना सांगितले. मात्र त्याने आत्महत्या करण्यासाठी नदीत उडी मारली, मात्र पोहता येत असल्याने त्याचा हा प्रयत्न फसल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.