पूरबाधित गावांसाठी दिलासा, अलमट्टी धरणातील पाणी पातळी यंदा नियंत्रित ठेवण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 06:19 PM2022-05-28T18:19:54+5:302022-05-28T18:51:31+5:30
सांगली : पावसाळ्यामध्ये कृष्णा खोऱ्यातील पूरनियंत्रणासाठी अलमट्टी धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा ...
सांगली : पावसाळ्यामध्ये कृष्णा खोऱ्यातील पूरनियंत्रणासाठी अलमट्टी धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागाशी दररोज माहितीची देवाणघेवाण केली जाणार असून, विविध धरणांमधून विसर्गाचे एकत्रित परिचालन करण्यात येईल. समन्वयासाठी अनुभवी सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंत्यांची अलमट्टी धरणावर नेमणूक होणार आहे.
जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीस कर्नाटकचे अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागाचे मुख्य अभियंता एच. सुरेश, अधीक्षक अभियंता डी. बसवराज, सांगलीचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता अशोक सुर्वे, साताऱ्याचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सांगलीच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता रोहित बांदवडेकर, कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार उपस्थित होते.
जलसंपदा विभागामार्फत कृष्णा व भीमा खोऱ्यासाठी एककालिक आधार सामग्री अधिग्रहण प्रणाली सक्षम करण्यात आली आहे. त्याद्वारे पर्जन्यमान, नदीची पाणी पातळी व विसर्ग यांची सद्यस्थिती व पूर्वानुमान उपलब्ध होते. या प्रणालीचा वापर अधिक सक्षमपणे करून कृष्णा उपखोऱ्यातील सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधून प्रभावी पूरनियंत्रण करता येईल, असा विश्वास गुणाले यांनी यावेळी व्यक्त केला. अशा प्रणालीचा अवलंब कर्नाटकात करण्यात येत असल्याचे एच. सुरेश यांनी सांगितले.
अलमट्टीच्या अधिकाऱ्यांची सहमती
राजापूर बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाच किलोमीटरवर नदीपात्रात नवीन पूल बांधकामासाठी करण्यात आलेला कॉपर डॅम व भराव काढून घेण्याबाबत अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक यांनी सुचविले. त्याबाबत अधीक्षक अभियंता डी. बसवराज यांनी सहमती दर्शवली. प्रभावी पूरनियंत्रणाच्या दृष्टीने अलमट्टीतील पाणी पातळी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियमित ठेवण्यास अलमट्टीच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली.