सांगलीत कृष्णेची पाणीपातळी २० फुटांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 07:15 PM2022-07-15T19:15:28+5:302022-07-15T19:15:56+5:30

ढगांची दाटी व पावसाची रिपरिप यामुळे गेल्या सहा दिवसांपासून सांगलीत सूर्यदर्शन झाले नाही.

The water level of Krishna in Sangli is 20 feet | सांगलीत कृष्णेची पाणीपातळी २० फुटांवर

सांगलीत कृष्णेची पाणीपातळी २० फुटांवर

Next

सांगली : जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम असून धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारी सायंकाळी पावसाचा जोर ओसरला. तरीही धरणातील विसर्ग व नदी पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सांगलीत आयर्विनजवळील पाणीपातळी आता २० फुटांवर गेली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी बहुतांश तालुक्यात पाऊस झाला. सांगली, मिरजेसह शिराळा, वाळवा तालुक्यात अविश्रांत पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे शहरे जलमय झाली आहेत. कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत गुरुवारी वाढ झाली. सांगलीतील पाणीपातळी बुधवारच्या तुलनेत दोन फुटांनी वाढली आहे. त्यामुळे नदीकाठी पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजता नोंदलेल्या आकडेवारीनुसार मागील चोवीस तासात सरासरी १३.५ मि. मी. पाऊस झाला. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३७.५ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

धरणातून विसर्ग सुरू

कोयना धरणातून सध्या २१०० क्युसेक्स तर वारणा धरणातून ८५१ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

कृष्णा नदीची पाणीपातळी (गुरुवारी सायं. ५ वा. पर्यंत)
बहे ८.६
ताकारी २१
भिलवडी २१.३
आयर्विन २०
अंकली २५
म्हैसाळ ३४

सांगली जिल्ह्यातील पाऊस मि.मी. (गुरुवारी स. ८ पर्यंत)
मिरज ७.५
जत ६.७
खानापूर-विटा १२.२
वाळवा-इस्लामपूर १७.१
तासगाव १२.६
शिराळा ३७.६
आटपाडी ७.३
कवठेमहांकाळ ६.६
पलूस ११.१
कडेगाव १७.७

कोयना धरण क्षेत्रात जोर ओसरला

कोयना धरण क्षेत्रात गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ३३, तर वारणा क्षेत्रात २० मि.मी. पाऊस नोंदला गेला आहे. बुधवारच्या तुलनेत या ठिकाणच्या पावसाचे प्रमाण गुरुवारी कमी होते.

सूर्यदर्शन नाहीच

ढगांची दाटी व पावसाची रिपरिप यामुळे गेल्या सहा दिवसांपासून सांगलीत सूर्यदर्शन झाले नाही. बुधवारी क्षणाचीही विश्रांती न घेता पाऊसधारा कोसळत राहिल्या.

Web Title: The water level of Krishna in Sangli is 20 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.