सांगलीत कृष्णेची पाणीपातळी दिवसात सहा फुटाने वाढली; म्हैसाळ, राजापूर बंधारे पाण्याखाली
By अशोक डोंबाळे | Published: July 20, 2023 01:21 PM2023-07-20T13:21:09+5:302023-07-20T13:21:26+5:30
जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी धरण क्षेत्रात जोरदार
सांगली : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी धरण क्षेत्रात पाऊस जोरात सुरू आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोयना धरण क्षेत्रात २५३ मिलिमीटर तर वारणा धरण क्षेत्रात १०२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कृष्णा नदीची दिवसात सहा फूट पाणीपातळी वाढून गुरुवारी १२ फूट ६ इंच झाली आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. कृष्णा नदीवरील म्हैसाळ, राजापूर बंधारे आणि वारणा नदीवरील दुधगाव (ता. मिरज) येथील खोची बंधारा पाण्याखाली गेला आहे.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळत होता. पण, गुरुवारी सकाळी सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्याच्या काही भागात उघडीप दिली आहे. शिराळा, वाळवा तालुक्यात मात्र पाऊस सुुरू आहे. वारणा-चांदोली धरण क्षेत्रात सलग दुसऱ्यादिवशी अतिवृष्टी झाली असून चोवीस तासात १०२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. कोकरूड बंधाऱ्यासह समतानगर जवळील पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच दुधगाव येथील खोची बंधाराही पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात दि. १ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस मिलिमीटरमध्ये : मिरज ५.९ (८९.९), जत १.१ (७१.७), खानापूर ५ (६६.१), वाळवा १८.४ (१०२), तासगाव ६.९ (१०६.६), शिराळा ४१ (२८८.५), आटपाडी १ (६५.५), कवठेमहांकाळ २.१ (७३.१), पलूस १४.२ (८२.९), कडेगाव ९.७ (७८.२).
धरणातील पाणीसाठा
धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना ३७.३७ (१०५.२५), धोम ५.९९ (१३.५०), कन्हेर ३.३९ (१०.१०), वारणा १९.०७ (३४.४०), दूधगंगा ७.४८ (२५.४०), राधानगरी ५.२३ (८.३६), तुळशी १.१७ (३.४७), कासारी १.५९ (२.७७), पाटगांव १.८७ (३.७२), धोम बलकवडी २.९८ (४.०८), उरमोडी ४.१९ (९.९७), तारळी ३.८६ (५.८५), अलमट्टी ३१.३९ (१२३).