‘कृष्णा’ कोरडी पडल्याच्या निषेधार्थ उद्या सांगलीत मोर्चा, पाणीटंचाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

By अशोक डोंबाळे | Published: October 26, 2023 04:04 PM2023-10-26T16:04:34+5:302023-10-26T16:05:51+5:30

शेतकरी, सामाजिक संघटनांकडून मुख्यमंत्र्यांकडेही लेखी तक्रारी

The water level of Krishna river in Sangli decreased, March in protest tomorrow | ‘कृष्णा’ कोरडी पडल्याच्या निषेधार्थ उद्या सांगलीत मोर्चा, पाणीटंचाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

‘कृष्णा’ कोरडी पडल्याच्या निषेधार्थ उद्या सांगलीत मोर्चा, पाणीटंचाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

सांगली : कोयना धरणात ८४.०६ टीएमसी पाणीसाठा असतानाही ऑक्टोबर महिन्यातच कृष्णा नदी कोरडी पडल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे कृष्णा नदी कोरडी पडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी शुक्रवारी, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. काही सामाजिक संघटनांनीही थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाणीटंचाईची लेखी तक्रार केली आहे.

आमदार अरुण लाड म्हणाले की, कृष्णा नदी कोरडी पडली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे इरिगेशन फेडरेशनमार्फत पाटबंधारे खात्याशी संपर्क साधला; पण त्यांनी पालकमंत्र्यांशी बोलावे लागेल, असे सांगितले. त्यावर पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला; पण अद्याप कसलाही कार्यवाही झाली नाही.

शेवटी कोयना धरण प्रशासनाशी पाणी सोडण्याबाबत चर्चा केली. त्यांनी सातारा येथील पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याशी बोलण्यास सांगितले. त्यानुसार शंभुराजे देसाई यांच्याशी संपर्क केला. त्यांनी कालवा समितीच्या बैठकीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय होईल, असे उत्तर दिले. शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत असताना मंत्री बेजबाबदारपणे उत्तरे देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच शुक्रवारी, दि. २७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आहे.

आमदारही रस्त्यावर उतरणार

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार अरुण लाड, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील हे पाणीटंचाईच्या प्रश्नावर शुक्रवारी शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होणार आहेत. कृष्णा नदीकाठच्या गावातील नागरिक, शेतकरी, पाणीपुरवठा संस्थांचे सभासदही मोर्चात सहभागी होणार आहेत.

स्वतंत्र भारत पक्षाचीही तक्रार

स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी कृष्णा नदी कोरडी पडल्याचे छायाचित्रासह निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मनोज भिसे यांनीही पाणीटंचाईची तक्रार मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: The water level of Krishna river in Sangli decreased, March in protest tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.