पुराचे संकट तूर्त टळले; सांगलीत कृष्णेची पाणीपातळी अर्ध्या फुटाने उतरली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 01:57 PM2024-07-29T13:57:57+5:302024-07-29T13:59:27+5:30

शिराळ्याव्यतिरिक्त जिल्हाभरात पावसाची विश्रांती

The water level of river Krishna has come down near Irwin Bridge in Sangli | पुराचे संकट तूर्त टळले; सांगलीत कृष्णेची पाणीपातळी अर्ध्या फुटाने उतरली

पुराचे संकट तूर्त टळले; सांगलीत कृष्णेची पाणीपातळी अर्ध्या फुटाने उतरली

सांगली : सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी रविवारी दिवसभरात अर्ध्या फुटाने उतरली. दुपारनंतर ५ वाजता ३९.५ फूट पातळी होती. त्यामुळे पुराचे संकट तूर्त टळले असून, नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात शिराळ्याव्यतिरिक्त अन्यत्र पावसाने विश्रांती घेतली.

जिल्ह्यात दिवसभर ढगांची गर्दी होती; पण दमदार पावसाने मात्र कोठेच हजेरी लावली नाही. शिराळा तालुक्यात मात्र पावसाचा जोर कायम आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्याची शक्यता धरण प्रशासनाने व्यक्त केली. पाऊस मंदावल्याने सध्या सुरू असलेला १६९७६ क्यूसेक विसर्ग कमी करण्याची तयारी सुरू होती, पण रविवारी पाऊस पुन्हा सुरू झाल्याने विसर्ग कमी करण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला. पावसाच्या प्रमाणावर पुढील सुधारित विसर्गाबाबत निर्णय होईल, असे प्रशासनाने सांगितले. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. पुनवत परिसरात वारणा नदीची पाणीपातळी दुपारी १ वाजता १० फुटांनी उतरली होती.

दरम्यान, पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेत कृष्णा घाट व ढवळी येथील पूरस्थितीची पाहणी केली. जनावरांसाठी चारा वाटप केले. पूरबाधितांसाठी निवारा केंद्र, भोजन, आरोग्य सुविधा, पाणी आदींची आवश्यकतेप्रमाणे सोय करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, मिरजेच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, माजी आमदार उल्हास पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: The water level of river Krishna has come down near Irwin Bridge in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.