कृष्णेच्या सांगली बंधाऱ्यावरून वाहतेय वादाचे पाणी; राजकीय, तज्ञ लोकांमध्येही एकमत दिसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 05:22 PM2022-05-19T17:22:51+5:302022-05-19T17:23:18+5:30
म्हैसाळला नवा बंधारा बांधल्यानंतर तिथून सांगलीपर्यंतच्या पात्रात दर उन्हाळ्यात जादा पाणी साठवून ठेवावे लागेल. त्याचे मोजमाप समजू शकलेले नाही.
अविनाश कोळी
सांगली : कृष्णा नदीचा सांगलीतील बंधारा काढून म्हैसाळमध्ये नवा बंधारा उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात आला असताना यावरून मतभेदांचे पाणी पुलाखालून वाहू लागले आहे. जलसंपदा मंत्र्यांनी हा प्रस्ताव अभ्यासाअंती सादर झाल्याचे स्पष्ट केले असले, तरी शहरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी हा अभ्यास जनतेसमोर मांडण्याची मागणी केली आहे.
सांगलीतील कृष्णा नदीचे पात्र दरवर्षी उन्हाळ्यात कोरडे पडते. गेल्या पाच वर्षांचा अपवाद वगळता नेहमी उन्हाळ्यात धरणातून पाणी सोडून ते सांगलीतील बंधाऱ्यापर्यंत साठवावे लागते. तेव्हाच सांगली, कुपवाड परिसराला पाणीपुरवठा होतो. काहीवेळा जिथून उपसा केला जातो, तिथे खोल खड्डा खणून पाणी साठवावे लागते. ही वस्तुस्थिती असताना सांगलीतील नदीतला बंधारा हटविल्यास उन्हाळ्यात सांगलीकरांना पाणी कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेचे काही निवृत्त पाणीपुरवठा अभियंता, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा प्रस्ताव अभ्यासाअंती तयार झाल्याचे सांगितले होते. म्हैसाळ बंधाऱ्यापासून सांगलीपर्यंत उन्हाळ्यातही पाणी साठवण होऊ शकते, अशी खात्री पाटबंधारे अधिकारी व मंत्री देत आहेत. हा अभ्यास किंवा त्याबाबतचा सर्वेक्षण अहवाल अद्याप खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे संभ्रमाची घाण या बंधाऱ्यात अडकली आहे.
म्हैसाळपासून सांगलीपर्यंत किती पाणी हवे
म्हैसाळला नवा बंधारा बांधल्यानंतर तिथून सांगलीपर्यंतच्या पात्रात दर उन्हाळ्यात जादा पाणी साठवून ठेवावे लागेल. त्याचे मोजमाप समजू शकलेले नाही.
पुराची तीव्रता कितपत कमी होणार
सांगलीचा बंधारा काढून म्हैसाळला केल्यानंतर महापुराची तीव्रता किती कमी होणार, याचा अभ्यास अद्याप झालेला् नाही. जयंत पाटील यांनी काही प्रमाणातच याचा फायदा होईल, असे सांगितले होते.
सांगलीचा बंधारा काढण्याची आवश्यकता का आहे? सांगली, कुपवाड व आसपासच्या गावांच्या उन्हाळ्यातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम कसा होणार नाही, या प्रश्नांची तांत्रिकदृष्ट्या मजबूत उत्तरे देऊन खुला परिसंवाद जलसंपदा विभागाने घ्यावा. - सतीश साखळकर, सामाजिक कार्यकर्ते
म्हैसाळमध्ये नवा बंधारा उभारण्याचा व सांगलीतील हटविण्याबाबत परिपूर्ण अभ्यास झाला आहे. सांगली, कुपवाडला पाण्याची समस्या उद्भवणार नाही. - मिलिंद नाईक, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, सांगली