सांगली जिल्ह्यातील पोलिस दलात महिला अधिकाऱ्यांच्या खाकीचा ‘रुबाब’!

By शरद जाधव | Published: March 8, 2023 04:52 PM2023-03-08T16:52:21+5:302023-03-08T16:54:07+5:30

जिल्हा पोलिस दलात महिला कर्मचाऱ्यांची संख्या ५०८ आहे तर पोलिस उपनिरीक्षक पदापासून अप्पर अधीक्षक पदापर्यंत २० महिला अधिकारी कार्यरत

The women police officers working in the Sangli District Police Force have made a mark through their work | सांगली जिल्ह्यातील पोलिस दलात महिला अधिकाऱ्यांच्या खाकीचा ‘रुबाब’!

सांगली जिल्ह्यातील पोलिस दलात महिला अधिकाऱ्यांच्या खाकीचा ‘रुबाब’!

googlenewsNext

शरद जाधव

सांगली : जिल्ह्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या कामातून ठसा उमटविला आहे.
पोलिस उपअधीक्षक दर्जाची तीन पदे रिक्त असल्याने सांगली वगळता संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी अश्विनी शेंडगे व पद्मा कदम प्रभावीपणे सांभाळत आहेत, तर अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून अलीकडेच ‘चार्ज’ घेतलेल्या आंचल दलाल यांनी थेट गावापर्यंत पोहोचत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याला प्राधान्य दिले आहे.

जिल्हा पोलिस दलात महिला कर्मचाऱ्यांची संख्या ५०८ आहे तर पोलिस उपनिरीक्षक पदापासून अप्पर अधीक्षक पदापर्यंत २० महिला अधिकारी कार्यरत आहेत. या सर्वच महिला अधिकाऱ्यांनी कार्यरत ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे. पोलिस ठाण्यातील महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासातही महिला अधिकाऱ्यांनी काम केले आहे. आव्हानात्मक तपासाच्या शाखा असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह ‘डीबी’ शाखेतही महिला कर्मचारी काम दाखवित आहेत. तर श्वानपथकासह अन्य पथकातही महिला कर्मचाऱ्यांनी स्वत:हून काम दाखवले आहे.

जिल्हा महिलांच्या हाती

जिल्ह्यात कार्यरत सहा उपविभाग असून, यातील तीन पदांवरील उपअधीक्षक पदे रिक्त आहेत. यात तासगाव उपविभागाच्या अश्विनी शेंडगे या तासगावासह अन्यही भागांचा पदभार सांभाळत आहेत तर विटा उपविभागातील पद्मा कदम यांनीही खानापूर, आटपाडीसह पश्चिम भागातील तालुक्यांचा पदभार स्वीकारला आहे. महिला अधिकाऱ्यांकडे चार-चार अधिकाऱ्यांचा पदभार असतानाही त्यांनी कामातील वेगळेपण दाखवून दिले आहे.

दलाल यांची एन्ट्री अन् कामाचा धडाका

बोलण्यापेक्षा कामातून आपला ठसा उमटविण्याला अप्पर अधीक्षक आंचल दलाल प्राधान्य देतात. यापूर्वी सातारा जिल्ह्यातही त्यांनी चांगली कामगिरी केली होती. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात कोठेही गुन्हा घडला की सर्वात प्रथम त्यांची ‘व्हीजीट’ ठरलेली असते. केवळ पाहणीच नव्हेतर त्यांच्याकडून पोलिसांना तपासाबाबत सूचनाही दिल्या जातात. त्याचा तपास अधिकाऱ्यांना फायदाही हाेताे. ‘मला बोलायला आवडत नाही, काम करायला आवडते’ हे वाक्यच त्यांच्या कामाची प्रचिती करून देते.

सर्वसामान्य महिलांना मिळतोय आधार

कोर्टाची आणि पोलिस ठाण्याची पायरी चढू नये म्हणतात; परंतु आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आता महिलाही दाद मागत आहेत. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसह अधिकारीही या महिलांचा आधार बनत आहेत. अनेक कुटुंबांना हे अधिकारी आधार देत आहेत. अनेकांचे तुटणारे संसारही त्यांच्यामुळे सावरले गेले आहेत.

Web Title: The women police officers working in the Sangli District Police Force have made a mark through their work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.