पंचशीलनगर रेल्वे पुलाचे काम बंद पाडले, भाजपसह विविध संघटनांचा विरोध
By अविनाश कोळी | Published: July 16, 2024 08:12 PM2024-07-16T20:12:41+5:302024-07-16T20:12:58+5:30
अतिक्रमण हटविण्याची महापालिकेची तयारी
सांगली: चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय जुना बुधगाव रस्त्यावरील पुलाचे काम करु नये, अशी मागणी करीत भाजपसह विविध संघटना व व्यापाऱ्यांनी एकत्र येत पुलाचे काम बंद पाडले. बॅरिकेटस् हटवून पुन्हा रस्ता सुरु करण्यात आला.
भाजपचे माजी आमदार नितीन शिंदे, माजी नगरसेविका स्वाती शिंदे, माधवनगर व्यापाऱ्यांचे नेते प्रदीप बाफना, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी ठेकेदाराला हे काम सुरू केल्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत विचारणा केली. चिंतामणीनगरच्या रखडलेल्या पुलामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. पुलाचे बांधकाम थांबवण्याची विनंती केली.
यावेळी नितीन शिंदे म्हणाले की, चिंतामणीनगर येथील काही मालमत्ताधारक न्यायालयात गेलेले आहेत. तो विषय संपविल्यानंतरच जुना बुधगाव रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाला सुरुवात करावी. जनतेचे हाल होणार असल्याने हे काम बंद करावे. पृथ्वीराज पवार म्हणाले की, चिंतामणनगर येथील पुलाचे रखडलेले काम आधी पूर्ण करावे. ते काम अर्धवट असताना पंचशीलनगर येथील काम कोणत्याही परिस्थितीत सुरू करू देणार नाही.
ॲड. स्वाती शिंदे म्हणाल्या की, महापालिकेने परवानगी दिली नसताना कामास का सुरुवात केली? महापालिकेच्या जलवाहिन्या, ड्रेनेज पाईपलाईन व विद्युत खांब स्थलांतरीत करून घ्यायला हवेत. त्यानंतर महापालिकेची रितसर परवानगी घेऊनच काम सुरु करावे.
सर्वांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ठेकेदाराने रस्ता खुला करीत काम बंद केले. यावेळी श्रीनिवास बजाज, अशोक गोसावी, प्रकाश निकम, आयुब पटेल, गजानन मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, रवी वादवणे, किरण गोसावी, सचिन देसाई, निलेश हिंगमिरे, भूषण गुरव, जयदीप चेंडके आदी उपस्थित होते.
चौकट
कामासाठी वृक्षतोड
रेल्वे गेट ओलांडल्यानंतर पंचशीलनगरकडे जाताना रस्त्यावर झाडे, विद्युत खांब यांचे अडथळे आहेत. रस्ता अरुंद असल्याने या मार्गावरील अडथळे दूर करण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी येथील काही झाडे व फांद्या तोडण्यात आल्या.
घनश्यामनगरमध्ये वाहतूक कोंडी
वृक्षतोड सुरू असताना मंगळवारी सकाळी पंचशीलनगर येथून घनश्यामनगरमार्गे पुन्हा रेल्वे गेटपर्यंत अशी बोळातून वाहतूक वळविण्यात आली होती. त्यामुळे या बोळात सकाळपासून वाहतूक कोंडी होत आहे.