म्हैसाळ विस्तारित योजनेचे काम दोन महिन्यांत सुरू, सांगलीतील वंचित चाळीस गावांचा पाणीप्रश्न मिटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:26 PM2022-11-24T12:26:53+5:302022-11-24T12:27:40+5:30

कर्नाटकने फेटाळला पाण्याचा प्रस्ताव

The work of the Maisal expansion scheme will start in two months | म्हैसाळ विस्तारित योजनेचे काम दोन महिन्यांत सुरू, सांगलीतील वंचित चाळीस गावांचा पाणीप्रश्न मिटणार

संग्रहित फोटो

googlenewsNext

जत : जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेपासून वंचित चाळीस गावांसाठी नवीन विस्तारित योजना दोन महिन्यात मंत्रिमंडळापुढे मंजूर करून या कामास प्रत्यक्षात सुरुवात करू, अशी ग्वाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी येथे दिली.

पालकमंत्री खाडे बुधवारी जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे. फडणवीस जतला पाणी देण्याच्या योजनेवर गांभीर्याने काम करत आहेत. आजमितीस या योजनेचा प्रस्ताव पुण्यात आहे. काही दिवसात तो मंत्रिमंडळासमोर येणार आहे.

२०२३ मध्ये या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला आमचे सरकार सुरुवात करेल. यासाठी साधारण दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही योजना पूर्ण करून जत तालुक्याला न्याय दिला जाईल. योजना शक्य तितक्या लवकर साकारण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेत आहे. माजी आमदार विलासराव जगताप हेही यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

कर्नाटकने फेटाळला पाण्याचा प्रस्ताव

जतने कर्नाटक शासनाकडे कोणत्याही मागणीचा प्रस्ताव दिलेला नाही. जत तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवण्यास आमचे सरकार समर्थ आहे. मागे आम्ही कर्नाटक सरकारकडे पाण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला होता. आज हेच लोक पाणी देणार असल्याचे सांगत आहेत. ही दिशाभूल करणारी दुटप्पी भूमिका आहे. लवकरच जत तालुक्याच्या कामाविषयी सकारात्मक चित्र दिसेल, असेही खाडे म्हणाले.

Web Title: The work of the Maisal expansion scheme will start in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली