Sangli: नवीन पोलिस अधीक्षक कार्यालयाचे काम पूर्णत्वाकडे, महाराष्ट्रदिनी उद्घाटनाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 01:20 PM2023-04-20T13:20:04+5:302023-04-20T13:21:15+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयाच्या प्रशस्त व देखण्या इमारतीनंतर आता पोलिस मुख्यालयाच्या या इमारतीमुळे सांगलीच्या वैभवात भर पडली
सांगली : विश्रामबागेतील पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम आता पूर्णत्वास आले आहे. रंगरंगोटीसह इतर कामे पूर्ण झाली असून, अंतर्गत फर्निचर व्यवस्थेसह इतर कामे सुरू आहेत. येत्या एक मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, महाराष्ट्रदिनी उद्घाटन होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयाच्या प्रशस्त व देखण्या इमारतीनंतर आता पोलिस मुख्यालयाच्या या इमारतीमुळे सांगलीच्या वैभवात भर पडली आहे.
विश्रामबाग येथे असलेल्या पोलिस अधीक्षक कार्यालयाची इमारत जुनी झाली आहे. पोलिस दलात वाढत असलेले विभाग व कामकाज लक्षात घेता, नवीन इमारतीची आवश्यकता होती. त्यानुसार इमारतीसाठी राज्य शासनाने १२ कोटींचा निधी मंजूर केला होता. भूमिपूजन झाल्यापासून एकदाही हे काम न थांबल्याने इमारत गतीने पूर्ण झाली आहे.
कार्यालयाची देखणी इमारत
पूर्वीचा दक्षिण सातारा जिल्हा असलेल्या सांगलीत १९६७ मध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयाची इमारत बांधण्यात आली होती. पूर्णपणे दगडी बांधकाम असलेली इमारत आजही वापरात आहे. आता नव्याने ५४ हजार चौरस फूट जागेवर बांधकाम करण्यात आले आहे.
अशी असेल इमारतीची रचना
तीनमजली इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. यात पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक, गृह उपअधीक्षकांचे कार्यालय, सायबर शाखा, कॉन्फरन्स हॉल, महिला सहायता कक्ष, भरोसा सेल, आर्थिक गुन्हे शाखा, सुरक्षा शाखा, जिल्हा विशेष शाखा, सीसीटीव्ही कक्ष असणार आहे.
दिमाखदार प्रशासकीय इमारती
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत लक्ष वेधून घेते. त्याशेजारची जिल्हा न्यायालयाची इमारतही प्रशस्त आहे. आता यात पोलिस अधीक्षक कार्यालयाची भर पडली आहे. दर्शनी भागात इमारत असावी, अशी सांगलीकरांची अपेक्षा असताना ही इमारत मात्र, एका बाजूला करण्यात आली आहे.