स्मारकाचा अडला शासन निधी, हिंदकेसरींना न्याय मिळणार कधी?; ग्रामस्थांतून नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 05:38 PM2023-08-22T17:38:24+5:302023-08-22T17:39:05+5:30
हिंदकेसरी मारुती माने यांचे कार्यकर्तृत्व भावी पिढ्यांना कळावे, म्हणून शासनाने स्मारक मंजूर केले. भूमिपूजनानंतरही सात वर्षे काम रखडले
सचिन ढोले
समडोळी : देशातच नव्हे, तर परदेशातही ताकद व कुस्तीकौशल्याच्या जोरावर ‘कुस्तीतला महाबली’ म्हणून बिरुदावली मिळालेल्या हिंदकेसरी मारुती माने यांचे कार्यकर्तृत्व भावी पिढ्यांना कळावे, म्हणून शासनाने स्मारक मंजूर केले. सात वर्षांपूर्वी भूमिपूजन झाल्यानंतरही निधीच्या रडगाण्यामुळे कवठेपिरान (ता.मिरज) येथील स्मारक अद्याप पूर्णत्वास गेले नाही. त्यामुळे कुस्तीला खऱ्या अर्थाने न्याय देणाऱ्या हिंदकेसरींच्या स्मारकास न्याय मिळणार तरी कधी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मारुती माने यांचे २०१० मध्ये निधन झाले. त्यानंतर, कवठेपिरानमध्ये गंजीखाना भागातील जागेत शासनाने स्मारक मंजूर केले. तत्कालीन मंत्री जयंत पाटील, पतंगराव कदम, आर.आर. पाटील आदींसह जुन्या काळातील मल्ल, कुस्तीप्रेमींच्या साक्षीने २०१६ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. या कामासाठी तीन कोटी चाळीस लाख निधी वापरला असला, तरी पुतळा, फर्निचर, ग्रंथालय, बहुउद्देशीय हॉल, प्रकाश झोतातील गॅलरी आदी कामे निधीअभावी रखडली आहेत.
स्मारक व पुतळा समिती स्थापन करण्यात आली. कालांतराने यातील अनेक दिग्गज नेत्यांचे निधन झाले. त्यानंतर, समिती अस्तित्वात राहण्यासाठीही प्रयत्न झाले नाहीत. पुतळा उभारणीचे काम पुण्यातील संस्थेला दिले आहे. ते काम अंतिम टप्प्यात आहे. आता तरी राज्य शासन व पालकमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून हिंदकेसरींना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
उर्वरित निधी गेला कुठे?
स्मारक कामासाठी ४ कोटी ९४ लाखांचा निधी मंजूर झाला, पण प्रत्यक्षात तीन कोटी चाळीस लाखांचे काम झाले आहे. उर्वरित रक्कम कोणत्या कामासाठी वापरली, हे कळू शकले नाही. शासनाने कामासाठी सुधारित अंदाजपत्रकानुसार निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
स्मारकाच्या कामासाठी समिती गठीत करण्याविषयी संबंधितांना सुचविले होते, पण त्यावर कार्यवाही नाही. स्मारकासाठी निधी आवश्यक नसल्याचा अभिप्राय जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिला आहे. काही जणांकडून दिशाभूल केली जात असून, कामात खोडा घालण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना भेटून भावना मांडणार आहोत. ते निश्चितपणे न्याय देतील. - पै.भीमराव माने, माजी सरपंच.