एक पाऊल पुढे, विधवेच्या पुनर्विवाहासाठी संसारसाहित्य देणार; सांगलीतील 'या' ग्रामपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 05:16 PM2022-05-24T17:16:15+5:302022-05-24T17:35:50+5:30
विधवा प्रथेविरोधात फक्त ठराव केला म्हणजे, समाजाची जबाबदारी संपत नाही. तिच्या पुनर्वसनाचा, पुनर्विवाहाचाही विचार व्हायला हवा.
सांगली : इनाम धामणी (ता. मिरज) ग्रामपंचायतीने विधवा प्रथेविरोधात ठराव करताना एक पाऊल पुढे टाकले आहे. एखादी विधवा पुनर्विवाहासाठी तयार असेल, तर तिला लग्न लावून देण्यात येणार आहे. संसारोपयोगी साहित्याची मदतही दिली जाणार आहे.
ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत तसा निर्णय झाला. ग्रामसेवक आर. डी. शिंदे यांनी विधवा प्रथेविषयी शासनाने काढलेल्या परिपत्रकाचे वाचन केले. गावात विधवा प्रथा सुरु ठेऊ नये असे आवाहन केले. सरपंच अश्विनी कोळी यांच्यासह सदस्यांनी त्याला एकमुखी पाठींबा देत ठराव संमत केला. पण त्यापुढेही एक पाऊल टाकत विधवेच्या पुनर्वसनाची जबाबदारीही स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
उपसरपंच अनिता पाटील यांनी तसा ठराव मांडला. सरपंच अश्विनी कोळी व उपसरपंच अनिता पाटील यांनी सांगितले की, विधवा प्रथेविरोधात फक्त ठराव केला म्हणजे, समाजाची जबाबदारी संपत नाही. तिच्या पुनर्वसनाचा, पुनर्विवाहाचाही विचार व्हायला हवा. त्याला उत्तेजन देण्यासाठी सक्रिय सहभाग घेणार आहोत.
संबंधित विधवा महिला पुनर्विवाहासाठी तयार असेल, तर सर्व जबाबदारी ग्रामपंचायत स्वीकारेल. संसारोपयोगी साहित्य देऊन नवा संसार उभा केला जाईल. यानिमित्ताने ग्रामपंचायत व समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे, ही जाणीव विधवेच्या मनात निर्माण होईल, तिचा जगण्याचा आत्मविश्वास वाढेल. या मदतीसाठी महिला व बालकल्याण विभागाचा निधी वापरता येईल असा सूरही बैठकीत व्यक्त झाला. बैठकीला सदस्य सुहास पाटील, महावीर पाटील, अमोल कोळी आदी उपस्थित होते.