फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरूणाला दोन वर्षांची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल
By शरद जाधव | Published: June 7, 2023 07:38 PM2023-06-07T19:38:38+5:302023-06-07T19:38:59+5:30
सांगली : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीस फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्रास देणाऱ्या तरूणास न्यायालयाने दोन वर्षांची ...
सांगली : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीस फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्रास देणाऱ्या तरूणास न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. विपुल राजेंद्र तोरे (वय २५, रा. शास्त्री नगर, पाण्याच्या टाकीजवळ, मालगाव, ता. मिरज) असे आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी ही शिक्षा सुनावली. सरकापक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अनिलकुमार कुलकर्णी यांनी काम पाहिले.
खटल्याची अधिक माहिती अशी की, पिडीता व आरोपीची फेसबुकच्यामाध्यमातून मैत्री झाली. दोघांचे एकमेकांशी बोलणे व चॅटींग होत असे. हा प्रकार पिडीतेच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पिडीतेला असला मित्र करु नको असा सल्ला दिला. यानंतर पिडीतेने आरोपीशी संपर्क बंद करुन मोबाईल नंबर बदलला होता.
यानंतर २०१९ मध्ये पिडीता महाविद्यालयातून घरी जाण्यासाठी सांगली बसस्थानकावर आली होती. तेव्हा आरोपीने तिला धमकी देऊन ‘तू तुझा नवीन मोबाईल नंबर मला दे, मला तुला फोन करुन बोलायचे आहे. तू मला तुझा मोबाईल नंबर दिला नाहीस तर चार महिन्यापूर्वी दोघांचा फोटो काढला आहे, तो मी तुझ्या आई वडिलांना दाखवतो.’ अशी धमकी दिली. यामुळे पिडीतेने नवीन मोबाईल नंबर त्याला दिला होता. यानंतर वारंवार त्रास देत असल्याने पिडीतेने तक्रार केली होती.
न्यायालयाने तोरे याला दोषी ठरवून दोन वर्षांची सक्तमजूरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी कक्षातील उपनिरीक्षक राडे, सीमा धनवडे, सुनीता आवळे आदींचे सहकार्य लाभले.
निर्भया पथकाकडे तक्रार
आरोपी वारंवार तिचा पाठलाग करून वारंवार गाडीवर बस अशी जबरदस्ती करत होता. ती गाडीवर बसली नाही किंवा कॉल न घेतल्यास तो फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. वारंवार होणाऱ्या त्रासामुळे पिडीतेने निर्भया पथकाकडे याबाबतची तक्रार केली होती. यानंतर आरोपी तोरे याच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.