राजारामबापू नाट्यगृहात गैरसुविधांचा रंगमंच : इस्लामपूर पालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:21 PM2018-06-19T23:21:27+5:302018-06-19T23:21:27+5:30
पालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादीने शहरात चांगल्या दर्जाचे नाट्यगृह बांधल्याचा कांगावा केला. याचे उद्घाटन ज्येष्ठ सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्याहस्ते झाले.
अशोक पाटील।
इस्लामपूर : पालिकेत सत्ता असताना राष्ट्रवादीने शहरात चांगल्या दर्जाचे नाट्यगृह बांधल्याचा कांगावा केला. याचे उद्घाटन ज्येष्ठ सिनेअभिनेते नाना पाटेकर यांच्याहस्ते झाले. परंतु काही दिवसातच हे नाट्यगृह दर्जाहीन झाल्याचे स्पष्ट झाले.
या नाट्यगृहातील ध्वनी यंत्रणेचे तीनतेरा वाजले असून, अद्यापही ही व्यवस्था सुरळीत झालेली नाही. यावर तीनवेळा लाखो रुपयांचा खर्च केला आहे. रविवारी झालेल्या ‘लोकमत’ सखी मंचच्या कार्यक्रमात तर चक्क नाट्यगृहातील साऊंड बॉक्सने पेट घेतला. प्रसंगावधान राखल्याने कोणताही अनर्थ घडला नाही.तत्कालीन मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी इस्लामपूर शहरात चांगल्या दर्जाचे नाट्यगृह असावे, असा मानस व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जागेत नाट्यगृह उभे केले. त्यावेळी नाट्यक्षेत्रातील लोकांना बरोबर घेऊन शहरी भागातील नाट्यगृहाची पाहणी करून त्या धर्तीवर इस्लामपूरचे नाट्यगृह करा, अशा सूचना जयंत पाटील यांनी संबंधितांना केल्या होत्या. परंतु या सूचनेकडे कोणीही गांभीर्याने न पाहिल्यानेच नाट्यगृहाची ध्वनी व्यवस्था पहिल्यापासूनच कोमात आहे. ती अद्यापही बाहेर आलेलीच नाही.
नाट्यगृहातील ध्वनी यंत्रणेत बिघाड असल्याने येथे कोणतेही चांगल्या दर्जाचे नाटक अद्याप आलेले नाही. तसेच कोणताही मोठा करमणुकीचा कार्यक्रमही आणण्याचे धाडस कोणी केलेले नाही. कारण येथील ध्वनी व्यवस्थाच अशी आहे. पैसे देऊन कोणीही येथे येऊ शकणार नाही. नाट्यगृहात जो कार्यक्रम मोफत असेल, तोच पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. आता तशी सवयच येथील नागरिकांना लागली आहे. त्यामुळे येथे तिकिटावर एकही कार्यक्रम होत नाही आणि एखाद्याने आणलाच, तर तोट्यात जाणार हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.
रविवारी नाट्यगृहात ‘लोकमत’ सखी मंचचा ‘इस्लामपूर सखी सम्राज्ञी’ हा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम सुरु असतानाच येथील एका साऊंड बॉक्सने अचानकपणे पेट घेतला. यावेळी महिलांची मोठी गर्दी होती. परंतु येथील ध्वनी यंत्रणेची जबाबदारी असणाऱ्या असीर तांबोळी यांनी प्रसंगावधान राखल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अशा अनेक कारणांनी नाट्यगृहातील ध्वनी यंत्रणा नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधलेले नाट्यगृह केवळ ध्वनी यंत्रणा बरोबर नसल्याने निरुपयोगी ठरत आहे.
आघाडीकडूनही दुर्लक्ष
विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर तरी नाट्यगृहाच्या ध्वनी यंत्रणेची साडेसाती जाईल असे वाटत होते. परंतु विकास आघाडीच बिघडली आहे. त्यामुळे त्यांनी नाट्यगृहातील बिघडलेल्या ध्वनी यंत्रणेकडे दुर्लक्ष केले आहे.
नाट्यगृह सुरु झाल्यापासूनच येथील ध्वनी यंत्रणा चर्चेचा विषय बनली आहे. त्यामुळे येथे कोणताही कार्यक्रम घेतला, तर बाहेरुन वेगळे भाडे देऊन ध्वनी यंत्रणेची व्यवस्था आणावी लागते. त्यामुळे याठिकाणी स्थानिक कलाकारांना कार्यक्रम घेणे परवडत नाही.
- उदय राजमाने, गायक व नाट्यरसिक, इस्लामपूर.